पटोलेंना गंभीरपणे घेत नसलेल्या फडणवीसांवर पटोलेंचे गंभीर आरोप - Patole makes serious allegation against Devendra Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

पटोलेंना गंभीरपणे घेत नसलेल्या फडणवीसांवर पटोलेंचे गंभीर आरोप

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 14 मे 2021

पटोेले यांच्या मागणीनुसार चौकशी होणार का?

मुंबई : काॅंग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State president Nana Patole) हे भाजपचे खासदार असताना काही प्रश्नांमुळे त्यांचे भाजपच्या नेत्यांशी बिनसू लागले. शेती प्रश्नांवरून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करू लागले आणि याच काळात त्यांचा फोन टॅप होत असल्याचे समोर आले आहे. याबाबत खुद्द नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आऱोप केले आहेत. (Nana Patole alleges phone tapping by Fadnavis Govt)

ही बातमी वाचा : रा. स्व. संघाच्या मंडळींनी गणवेशात येऊन सेवा देऊ नये...

पटोले यांनी कोणताही आरोप किंवा मत व्यक्त  केले की फडणवीस आपण पटोलेंना फार गंभीरपणे घेत नाही, असे प्रत्युत्तर देऊन पटोलेंच्या टिकेची दखल घेत नाहीत. आता नानांनी थेट फडणवीस यांच्याच काळात आपला फोन टॅपिंग होत असल्याचा आऱोप केला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर काही अधिकाऱ्यांचे आणि पोलिस बदल्यांचे कथित रॅकेट केलेल्यांचे फोन टॅपिंगचे प्रकरण गाजते आहे. त्यात पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांची चौकशी सुरू आहे. शुक्ला यांनी या कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र त्यांना तेथे दिलासा मिळाला नाही. चौकशी सुरूच राहणार असून त्यांना अटकेपासून मात्र संरक्षण मिळाले आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर पटोले यांच्या आऱोपांचे काय होणार, याची आता उत्सुकता आहे. 

नाना पटोले काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात २०१६-१७ साली फोन टॅपिंग करण्यात आले होते. त्यात माझाही फोन टॅप करण्यात आला होता, अशी माहिती आपल्याला खाजगी टीव्ही चॅनलकडून मिळाली. यात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याच्या नावाखाली राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यात आले. या प्रकरणी नंबर माझा व अमजदखान असे खोटे नाव वापरण्यात आले होते. या फोन टॅपिंगशी संबंधीत सर्वांची महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.

फडणवीस सरकारच्या काळात माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष तसेच शिवसेनेतील काही महत्वाचे नेते आणि काही आयएएस, आयपीएस अधिकारी यांचेही फोन टॅपिंग केले जात होते. माझा संबंध अंमली पदार्थांच्या तस्करीशी जोडण्याचा प्रयत्न करुन हा निंदनीय व अश्लाष्य प्रकार करण्यात आला आहे. फोन टॅपिंग करताना नावे व पत्ते खोटी तसेच बनावट दाखवून फोन टॅप करण्यात आले. हे फोन टॅपिंग कोणी केले आणि त्यांना परवानगी कोणी दिली ? फोन टॅपिंग करण्याचा उद्देश काय होता ? फोन टॅप करुन एखाद्या व्यक्तीवर पाळत ठेवणे हा गुन्हा आहे तसेच हा प्रकार व्यक्ती स्वातंत्र्याचा भंग करणारे असून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे खपवून घेणार नाही. जे कोणी या फोन टॅपिंगशी संबंधीत होते त्यांची चौकशी करून कठोर कारवाई करावी

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख