
Political News : भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे एकाच महिन्यात दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार होते. यापूर्वी खारघर येथील महाराष्ट्र भूषण सोहळ्यासाठी ते आले होते. नंतर ते नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या उद्घाटन सोहळ्यासाठी नागपूरला येणार होते. एकाच महिन्यांत दुसऱ्यांदा महाराष्ट्र येत असल्यानं शाह यांच्या दौऱ्याकडं सर्वांचच लक्ष लागलेलं होतं. पण त्यांचा नियोजित दौरा ऐनवेळी रद्द झाल्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
नागपूर येथील कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरसंघचालक मोहन भागवत, उद्योगपती गौतम अदानी यांसह विविध अनेकजण उपस्थित होते. पण या सोहळ्याला केंद्रीय मंत्री अमित शाह अनुपस्थित राहिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. कारण खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या स्वागतासाठी नागपूर येथे हजर होते. तसेच शाह यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. पण ऐनवेळी शाह यांचा दौरा रद्द झाला. यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
... म्हणून शाहांनी टाळला नागपूरचा दौरा?
केंद्रीय मंत्री अमित शाह(Amit Shah) गुरुवारी कॅन्सर इन्स्टिट्यूट उद्घाटनासाठी नागपुरात येणार होते.या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री गडकरींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरसंघचालक मोहन भागवत, उद्योगपती गौतम अदानी हेही निमंत्रित होते.
आधीच राज्यात मुख्यमंत्री बदलाची चर्चा जोरदारपणे सुरु असलेल्या चर्चांना शाह यांच्या एका महिन्यातील दुसऱ्या महाराष्ट्र दौऱ्यानं हवा मिळण्याची शक्यता, तसेच भागवत - शाह एकाच व्यासपीठावर आणि नागपुरातच एकत्र आल्यानं विरोधकांना टीकेची मिळणारी आयती संधी, तसेच वादग्रस्त उद्योगपती गौतम अदानींसोबत स्टेज शेअर करणं सध्या गैरसोयीचे वाटत असल्यानेच शाह यांनी हा नागपूर दौरा ऐनवेळी रद्द केल्याचं बोललं जात आहे.
भाजपनं सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजयासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्याचमुळे प्रचारादरम्यान भाजपनं पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक स्टार प्रचारकांची फळी मैदानात उतरवली आहे. शाह यांची कर्नाटकातील बागलकोटमध्ये गुरुवारी सभा होती. या निवडणुकीतील प्रचंड व्यस्त कार्यक्रमामुळे हा दौरा रद्द केल्याची चर्चा आहे. तसेच ते दिल्लीतील नियोजित कार्यक्रमात व्यस्त असल्यानं या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नसल्याची माहिती समोर येत आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.