
Parbhani : तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या पक्षानं राष्ट्रीय स्तरावर मोर्चा वळविला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राव यांच्या बीआरएसनं काही महिन्यांपूर्वीच नांदेडमार्गे महाराष्टाच्या राजकारणात पाऊल ठेवले होतं. यानंतर आत्तापर्यंत मराठवाड्यातील अनेक दिग्गज नेते बीआरएस पक्षाच्या गळाला लागले आहे. परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष महेश फड यांनी आज हैद्राबाद येथे के चंद्रशेखर राव यांच्या हस्ते माणिकराव कदम यांच्या उपस्थितीत बीआरएसचा झेंडा हाती घेतला आहे.
भारत राष्ट्र समितीचे संस्थापक अध्यक्ष तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव(KCR) यांनी महाराष्ट्रात येऊन अबकी बार किसान सरकार अशी घोषणा देऊन राज्यभरात राजकीय खळबळ उडवुन दिली आहे. नांदेड संभाजीनगर येथे मोठ्या मोठ्या सभांचे आयोजन करुन राजकीय वातावरण तापवलं आहे. काही दिवसांपूर्वीच बीआरएसनं महारा्ष्ट्रातील विधानसभा, नगर परिषद यांच्यासह सर्व निवडणुका लढण्याची घोषणा केली होती.
तसेच लवकरच महाराष्ट्रातील भाजप(BJP) आणि शिवसेनेतील नगरसेवक आणि आमदारांचाही ३०० जण बीआरएस पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा पक्षानं केला होता. प्रवेश करणाऱ्यांमध्ये भाजप आणि शिवसेनेतील नगरसेवक आणि आमदारांचाही समावेश असल्याचंही म्हटलं होतं. सुरुवातीला शेतकरी चळवळीच्या माध्यमातून राज्यात शिरलेल्या भारत राष्ट्र समितीने राज्यात चांगलेच राजकीय बाळसे धरले असून पंचवीस माजी आमदार,माजी खासदार ,जिल्हा परिषद अध्यक्ष,नगरसेवक अनेक राजकीय पदाधिकारी भारत राष्ट्र समितीमध्ये सहभागी झाले आहेत.
आता पाथरी विधानसभेमध्ये अपक्ष आमदार मोहन फड यांचे बंधू व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष महेश फड(Mahesh Phad) यांनीही बीआरएस पक्षात प्रवेश केल्यानं जिल्ह्यातील राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासह अनेक सामाजिकपदेही फड यांनी भूषवली आहेत.
फड यांच्या कुटुंबियांचा जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा प्रभाव आहे. त्यांचे वडील माधवराव फड यांना जिल्हा पातळीवर मोठा सन्मान आहे. त्यांचे बंधु मोहन फड हे पाथरी विधानसभेमध्ये अपक्ष आमदार म्हणुन निवडुन आले होते. तर त्यांचे बंधु परभणी महापालिकेत सदस्यही होते. फड यांच्या बीआरएस पक्षप्रवेशानं जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलुन जाणार आहेत.
परभणी जिल्ह्यातील अनेक मातब्बर राजकीय पदाधिकारी भारत राष्ट्र समितीच्या उंबरठ्यावर उभे होते. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष महेश फड यांच्या पक्षप्रवेशाने परभणी जिल्ह्यात गुलाबी वादळ धडकले असुन लवकरच जिल्ह्यातील अनेक राजकीय पक्षाचे नेते भारत राष्ट्र समिती(BRS)मध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याचे माणिकराव कदम यांनी सांगितले .
नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकीत अनेक ठिकाणी भारत राष्ट्र समितीला चांगलेच यश मिळाले आहे. परभणी जिल्ह्यातील माणिक कदम यांनी सुरु केलेल्या या राजकीय आंदोलनात आता परभणी जिल्ह्यातुन राजकीय पाठिंबा मिळत आहे .
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.