Jaykumar Rawal Maharasthra Youth Leader in Sarkarnama Diwali Aank Interview | Sarkarnama

दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प : जयकुमार रावल

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

राजकारणाचा वारसा आणि तळागाळात वर्षानुवर्षं केलेलं काम यामुळे उत्तर महाराष्ट्रातील मातब्बर चेहरा म्हणून #युवानेतृत्व जयकुमार रावल यांचे नाव घेतले जाते...सामान्य कार्यकर्ता ते महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री हा प्रवास रावल यांनी सरकारनामा फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून मांडला

जळगाव : ''सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आणि गेल्या काळात पाण्याचे चुकीचे नियोजन झाल्याने महाराष्ट्राला कायमस्वरुप दुष्काळाचे ग्रहण लागले आहे. खानदेशातील स्थितीही त्याला अपवाद नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जलयुक्त शिवारसारख्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प केलांय आणि तो नक्कीच सिद्धीस नेणार,'' असा विश्‍वास राज्याचे पर्यटन विकास व रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला. 

'सरकारनामा'च्या फेसबुक पेजवरील लाइव्ह मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी सरकारच्या विविध कल्याणकारी योजना व प्रकल्पांचा आढावा सादर केला. 'सकाळ' खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक राहुल रनाळकर यांनी ही मुलाखत घेतली.

जयकुमार रावल यांच्याशी झालेली प्रश्नोत्तरे अशी - 

-भाजपला मिळालेल्या यशामुळे अपेक्षा वाढल्यात, त्या अपेक्षापूर्तीसाठी आपले नियोजन काय? 
रावल : गेल्या अनेक वर्षांत सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेस आघाडी सरकारने खानदेशात व राज्यात पाण्याचे नियोजन केले नाही. खानदेश तर कायमस्वरुपी दुष्काळी प्रदेश. त्याकडे पूर्ण दुर्लक्षच झाले. राज्यावर कोट्यवधींचे कर्ज आघाडी सरकारने करुन ठेवले. त्यातून मार्ग काढताना मुख्यमंत्र्यांच्या अभ्यासू नियोजनातून आता विकासाची कामे दिसू लागली आहेत. विविध योजना व प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यातील 40 ते 50 टक्के जमीन आम्हाला बागायती करायची आहे. विकासाचे चित्र काही दोन-चार वर्षांत दिसत नाही. सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर आठ- दहा वर्षांत हे चित्र बदललेले दिसते, त्यादृष्टीने भाजप सरकारची वाटचाल सुरु आहे. आमच्या शिंदखेड्यात तर कायमचाच दुष्काळ. तापी, बुराई नदी असतानाही आमच्याकडे पाणी नाही. अशा स्थितीत मुख्यमंत्र्यांनी शिंदखेड्यासाठी 21 कोटींची पाणीयोजना मंजूर केली, त्यामुळे पाण्याची अडचण मिटली. अन्य भागातही अशी कामे करण्यावर आमचा भर आहे. संपूर्ण राज्यच येत्या काही वर्षांत दुष्काळमुक्त करण्याचा आम्ही संकल्प केला असून तो पूर्ण करणारच. 

- धुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी म्हणून आपण या भागाच्या विकासाकडे कसे बघता? 
रावल : आमच्या भागातील अनेक योजना अपूर्ण आहेत. सुलवाडे- जामफळ प्रकल्प 2400 कोटींचा असून तो अपूर्ण आहे, त्याच्या पूर्णत्वासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत. हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा संकल्प असून त्या माध्यमातून एक लाख हेक्‍टर जमीन सिंचित होणार आहे. नंदूरबार येथे कृषी महाविद्यालयासह शासकीय महाविद्यालयास मंजुरी मिळाली आहे. येत्या दोन वर्षांत खानदेशातील विकासाचे चित्र नक्कीच बदललेले दिसेल. तर देशात आपले राज्य पुन्हा गतवैभव प्राप्त करेल. मुख्यमंत्र्यांनी 2022 पर्यंत "ट्रिलियन डॉलर महाराष्ट्रा'चे स्वप्न पाहिले आहे, त्यादृष्टीने आमची वाटचाल सुरु आहे. 

या मुलाखतीचा आधीचा भाग - पर्यटनाला रोजगाराची जोड देत विकास : जयकुमार रावल 

सरकारनामाचा दिवाळी अंक अॅमेझाॅनवरुन सवलतीच्या दरात मिळवा

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख