दक्षिणेत मोठी घडामोड : मुख्यमंत्र्यांच्या भगिनीचा नवीन पक्ष अन् मदतीला प्रशांत किशोर

आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री वाय. एस. आर. रेड्डी यांच्या कन्या वाय.एस.शर्मिला यांनी वायएसआर तेलंगण पक्ष हा नवा पक्ष स्थापन केला आहे.
ysrtp chief y s sharmila signs deal with prashant kishor
ysrtp chief y s sharmila signs deal with prashant kishor

हैदराबाद  : आंध्र प्रदेशचे (Andhra Pradesh) दिवंगत मुख्यमंत्री वाय. एस. आर. रेड्डी यांच्या कन्या वाय.एस.शर्मिला (Y.S.Sharmila) यांनी वायएसआर तेलंगण पक्ष हा नवा पक्ष स्थापन केला आहे. त्या तेलंगणमधील सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समिती (TRS) आणि मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव (KCR) यांच्या विरोधात मैदानात उतरल्या आहेत. यातच शर्मिला यांनी मदतीला रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor)  यांना घेतल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. 

प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय रणनीतीकार म्हणून निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती. परंतु, त्याआधीच त्यांनी शर्मिला यांच्यासोबत काम करण्याचे ठरवले होते. शर्मिला यांच्या पक्षासाठी ते कशाप्रकारे काम करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, हे काम पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे. शर्मिला यांच्या पक्षाला भक्कम करण्यात थेट प्रशांत किशोर सहभागी होणार नाहीत, असे समजते. परंतु, त्यांची टीम शर्मिला यांच्या मदतीसाठी असेल. 

काही दिवसांपूर्वी माध्यमांनी शर्मिला यांना याबाबत विचारल होते. यावर त्यांनी प्रशांत किशोर यांच्यासारख्या रणनीतीकारांची मदत घेण्यात काय गैर असा उटल सवाल केला होता. शर्मिला यांचे बंधू जगनमोहन यांनी आंध्र प्रदेशात यश मिळवले त्याप्रमाणे त्या तेलंगणमध्ये यश मिळवणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जगनमोहन यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्रिपद मिळवले आहे. त्यांची पुनरावृत्ती शर्मिला करणार का, याकडे लक्ष लागले आहे. 

सरकारी नोकरभरती होत नसल्याने सरकारच्या विरोधात शर्मिला यांनी मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. शर्मिला यांनी मुख्यमंत्री राव आणि राज्य सरकारला नोकरभरतीच्या मुद्द्यावरुन लक्ष्य करीत आहेत. शर्मिला यांनी सरकारच्या विरोधात सुरू केलेल्या या आंदोलनाला जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे. सरकारच्या विरोधात दर मंगळवारी उपोषण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.  राज्यातील बेरोजहगारीचा प्रश्न चर्चेत असताना शर्मिला यांनी त्याला हात घातला आहे. यामुळे त्यांना जनतेकडून पाठबळ मिळू लागले आहे. या सर्व घडामोडींमुळे मुख्यमंत्र्यांसमोरील अडचणीत मात्र, दिवसेंदिवस वाढ होत आहे. सरकारने तातडीने नोकरभरतीची जाहिरात काढावी, अशी मागणी शर्मिला यांनी लावून धरली आहे. 

शर्मिला या मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांच्या भगिनी आहेत. शर्मिला यांच्या पक्ष स्थापनेचा जंगी कार्यक्रम हैदराबादमध्ये झाला होता. तेलंगणमध्ये २०२३ मध्ये विधानसभा निवडणूक होणार असून, शर्मिला यांनी आतापासूनच जोरदार तयारी केली आहे. शर्मिला यांच्या पाठीशी त्यांच्या मातोश्री वाय.एस. विजयालक्ष्मी खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. विशेष म्हणजे पुत्र जगनमोहन यांनी काँग्रेस सोडून नवीन पक्ष स्थापन केला, त्यावेळीही विजयलक्ष्मी त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या होत्या. शर्मिला आणि विजयालक्ष्मी यांनी पक्षस्थापनेच्या आधी वायएसआर यांच्या स्मारकाला भेट दिली होती. 

काही दिवसांपूर्वी हैदराबाद ते खम्मम अशी मोठी रॅली शर्मिला यांनी काढली होती. नंतर त्यांनी खम्मम येथे जाहीर सभा घेतली. शर्मिला यांनी त्यांचे वडील आंध्र प्रदेशचे (अविभाजित) माजी मुख्यमंत्री दिवंगत वाय.एस.आर. रेड्डी यांच्या समर्थकांची बैठक आधी घेतली होती. ही बैठक त्यांनी त्यांच्या लोटस पाँड येथील निवासस्थानी घेतली होती. या बैठकीत पक्षाच्या स्थापनेचा निर्णय घेण्यात आला होता. नंतर राजशेखर रेड्डी यांच्या जन्मदिनाचा मुहूर्त पक्षस्थापनेसाठी निवडण्यात आला होता. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com