कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदासाठी आजी अन् माजी केंद्रीय मंत्री शर्यतीत

दक्षिणेत भाजपची सर्वप्रथम सत्ता स्थापन करणारे मुख्यमंत्री येडियुरप्पा आता पायउतार झाले आहेत. त्यांच्या जागी आता अनेक नावे शर्यतीत आली आहेत.
who will replace karnataka chief minister yediyurappa
who will replace karnataka chief minister yediyurappa

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांनी राजीनामा दिला आहे. राज्यातील भाजप (BJP) सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली. येडियुरप्पांच्या राजीनाम्याने त्यांच्या जागी कोण, ही चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी दोन केंद्रीय मंत्री शर्यतीत असून, भाजपचे राष्ट्रीय पातळीवरील दोन पदाधिकाऱ्यांची नावेही समोर आले आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर भाजप नेतृत्वाने पुढील मुख्यमंत्री ठरवण्यासाठी पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री निवडीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून धर्मेंद्र प्रधान आणि कर्नाटकचे प्रभारी अरुणसिंह यांनी नेमण्यात आले आहे.  केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि माजी केंद्रीय मंत्री डी.वाय. सदानंद गौडा यांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर आहेत. तसेच, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी.रवी आणि पक्षाचे संघटन चिटणीस बी.एल.संतोष यांचीही नावे शर्यतीत आहेत. 

जोशी आणि संतोष हे दोन ब्राह्मण चेहरे आहेत. रवी हे आमदार असून, वक्कलिग समाजाचे आहेत. या समाजाचेही राज्यात प्राबल्य आहे. सदानंद गौडा हे गौडा समाजाचे असून, हा समाजाचेही राज्यात वर्चस्व आहे. गौडा यांनी नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला आहे. यामुळे त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. 

येडियुरप्पांचे कट्टर विरोधक मानले जाणारे बसनगौडा पाटील यतनाळ यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री असलेले यतनाळ आता आमदार आहेत. त्यांनी येडियुरप्पांच्या विरोधात मोहीम उघडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येडियुरप्पांच्या जागी प्रामाणिक आणि हिंदुत्वाचा अजेंडा पुढे नेणारा मुख्यमंत्री नेमतील, असे विधान यतनाळ यांनी नुकतेच केले होते. याचबरोबर येडियुरप्पांच्या मंत्रिमंडळातील लिंगायत चेहरे असलेले मुरुगेश निरानी आणि आमदार अरविंद बेळ्ळाद यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. 

येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली. यानंतर येडियुरप्पा तातडीने राजभवनावर राज्यपालांच्या भेटीला गेले होते. तिथे त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवला आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी येडियुरप्पांचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यांनी येडियुरप्पांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नेमणूक केली आहे. नवीन मुख्यमंत्र्यांची निवड होईपर्यंत येडियुरप्पा राज्याची धुरा सांभाळतील. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com