मुख्यमंत्र्यांचा राजीनामा धक्कादायक! शिक्षणमंत्र्यांनी व्यक्त केलं आश्चर्य

दक्षिणेत भाजपची सर्वप्रथम सत्ता स्थापन करणारे मुख्यमंत्री येडियुरप्पा आता पायउतार झाले आहेत. त्यांच्या राजीनाम्यामुळे अनेक जणांना धक्का बसला आहे.
karnataka education minister k sudhakar comment on yediyurappa
karnataka education minister k sudhakar comment on yediyurappa

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांनी राजीनामा दिला आहे. राज्यातील भाजप (BJP) सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली. येडियुरप्पांच्या राजीनाम्याने मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना धक्का बसला आहे. शिक्षणमंत्री के. सुधाकर (K. Sudhakar) यांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. येडियुरप्पांनी राजीनामा देताच त्यांच्या शिमोगा (Shivamogga) जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. 

येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली. यानंतर येडियुरप्पा तातडीने राजभवनावर राज्यपालांच्या भेटीला गेले होते. तिथे त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवला आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी येडियुरप्पांचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यांनी येडियुरप्पांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नेमणूक केली आहे. नवीन मुख्यमंत्र्यांची निवड होईपर्यंत येडियुरप्पा राज्याची धुरा सांभाळतील. 

येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा करताच अनेकांना धक्का बसला आहे. राज्याचे शिक्षणमंत्री के.सुधाकर यांनी याबद्दल उघड आश्चर्य व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा करणे हे धक्कादायक आहे. पक्षाच्या हाय कमांडकडून आपल्या बाजूने निर्णय घेतला जाईल, असा विश्वास येडियुरप्पांना होता. हाय कमांडकडून माझ्याबाबत चांगला निर्णय घेतला जाईल, असे खुद्द येडियुरप्पांनीच मला सांगितले होते. 

येडियुरप्पांनी राजीनामा देताच त्यांच्या शिमोगा जिल्ह्यात दुकाने आणि व्यवसाय तातडीने बंद करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. येडियुरप्पांना पक्ष नेतृत्वाने राजीनामा द्यायला लावल्याबद्दल त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी निर्माण झाले आहे. येडियुरप्पांच्या शिकारीपुरा गावातही बंद पाळण्यात आला आहे. 

येडियुरप्पांनी यांनी ट्विट करुन राजीनाम्याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, मागील दोन वर्षे राज्याची सेवा करणे हा माझ्यासाठी सन्मान होता. मी आता कर्नाटकचा मुख्यमंत्री म्हणून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील जनतेने मला त्यांची सेवा करण्याची संधी दिली याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभारी आहे. 
येडियुरप्पा हे 78 वर्षांचे आहेत. त्यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाकडून पावले उचलण्यास सुरवात झाली होती. येडियुरप्पा यांना यासाठी मागील आठवड्यात दिल्लीलाही बोलावून घेण्यात आले होते. पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ते भेटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही येडियुरप्पा यांनी भेट घेतली. या भेटीत येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. यासाठी येडियुरप्पांनी प्रकृतीचे कारण पुढे केले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com