धक्कादायक : भारतात सापडली बनावट कोविशिल्ड लस, सिरमनंही केलं मान्य

भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये कोविशिल्ड लशीचे डोस मोठ्या प्रमाणावर दिले जात आहे.
WHO issues alert on fake Covishield vaccine in india
WHO issues alert on fake Covishield vaccine in india

नवी दिल्ली : कोरोनापासून (Covid-19) संरक्षणासाठी जगभरात दिल्या जाणाऱ्या कोविशिल्ड लशीच्या काही वायल्स बनावट असल्याचं समोर आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) याबाबत अलर्ट दिला असून पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानंही (SII) हे मान्य केल्यानं खळबळ उडाली आहे. (WHO issues alert on fake Covishield vaccine in india)

भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये कोविशिल्ड लशीचे डोस मोठ्या प्रमाणावर दिले जात आहे. ही लस पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटकडून उत्पादित केली जात आहे. या लशीचा सर्वाधिक पुरवठा सध्या भारतातच होत आहे. त्यातच आता बनावट लशीची बातमी आल्यानं चिंता वाढली आहे. बनावट लस भारतात मिळत असल्याचा अलर्ट WHO ने दिला आहे.

भारतात लस पुरवठा व वितरणाचे व्यवस्थापन करणारी स्वतंत्र यंत्रणा आहे. खासगी रुग्णालयांना थेट कंपनीकडूनच लस घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच राज्यांना केंद्र सरकारकडून लशींचा पुरवठा केला जातो. त्यानंतरही WHO जागतिक देखरेख आणि नियंत्रण यंत्रणेला भारतासह युगांडामध्ये कोविशिल्ड लशीचे बनावट डोस आढळून आले आहेत. त्यानंतर मंगळवारी दक्षिण-पूर्व आशिया आणि आफ्रिकेत अलर्ट जारी करण्यात आला. 

जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये बनावट लशीचे डोस आढळले आहेत. WHO म्हणण्यानुसार सिरम इन्स्टिट्यूटने बनावट लशीच्या काही वायल्स मिळत असल्याचे मान्य केलं आहे. त्यामुळे WHO ने भारतीय आरोग्य यंत्रणेला रुग्णालये, क्लिनिक, आरोग्य केंद्र, वितरक, औषध विक्रेते आदी पातळ्यांवर अधिक सतर्क राहण्याची विनंती केली आहे. पण बनावट लस नागरिकांना दिली गेली आहे किंवा नाही, याबाबत स्पष्टता नाही.

भारतामध्ये कोविशिल्ड लशीचे दोन मिली म्हणजे चार डोस असलेल्या वायल्स सापडल्या आहेत. सिरमकडून केवळ दोन मिली लस असलेली वायल्स उप्तादित केल्या जात नाहीत. तर युगांडामध्ये कोविशिल्ड लशीच्या 4121Z040 या बॅचच्या आणि 10 ऑगस्ट 2021 पर्यंत मुदतीच्या वायल्स आढळल्या होत्या. या वायल्स बनावट असल्याचे सिरमने स्पष्ट केलं आहे. भारतात लस वितरणाची यंत्रणा अत्यंत पारदर्शक असल्यानं अशा गोष्टी होणार नाही. मात्र, हा प्रकार समोर आल्यानं याबाबत तपासणी केली जाईल, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com