चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला या आज चार वर्षानंतर तमिळनाडूत परतल्या. कर्नाटक सीमेवर समर्थकांनी फुलांची उधळण करत त्यांचे जंगी स्वागत केले. दरम्यान, शशिकलांचे ज्या मोटारीत आगमन झाले ती अण्णाद्रमुकच्या नेत्याची असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी मोटारीवरील अण्णाद्रमुकचा ध्वज काढू नये यासाठी शशिकलांनी हा गनिमी कावा केल्याचे स्पष्ट झाले आहे.
आज सकाळी जयललिता यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून शशिकला बंगळूरमधून निघाल्या. अण्णाद्रमुकने विरोध करुनही त्यांनी पक्षाचा ध्वज मोटारीवर लावला होता. त्यांच्या समर्थकांनीही हातात पक्षाचे झेंडे घेतले होते. सुरक्षेसाठी तमिळनाडू-कर्नाटक सीमेवर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यांनी तमिळनाडूत प्रवेश केल्यानंतर समर्थकांनी त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर फुलांची उधळण केली. रस्त्यातच्या दुतर्फा समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. त्यांच्या स्वागताचे मोठे फलक लावण्यात आले होते. चेन्नईच्या रस्त्यावरही मोठे फलक लावण्यात आले आहेत. कर्नाटक सीमेवरून त्या थेट चेन्नईकडे रवाना झाल्या.
शशिकलांनी तमिळनाडूत पाऊल टाकताच अण्णाद्रमुकला बसला पहिला मोठा धक्का!
शशिकलांचे ज्या मोटारीतून आगमन झाले ती अण्णाद्रमुकचे नेते एस.आर.संबांगी यांच्या मालकीची असल्याचे समोर आले आहे. या मोटारीवर अण्णाद्रमुकचा ध्वज शशिकलांनी वापरला होता. पोलिसांनी मोटारीवरील ध्वज काढू नये, यासाठी शशिकलांनी अण्णाद्रमुकच्या नेत्याचीच मोटार वापरण्याची युक्ती केली. स्वत: संबांगी हेही शशिकलांच्या स्वागतासाठी होसूर येथे उपस्थित होते.
ही बाब समोर येताच मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांचा तीळपापड झाला. त्यांनी तातडीने संबांगी यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा केली. याचबरोबर त्यांच्याशी कुणीही संबंध ठेवू नयेत, अशी तंबी पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे. याचबरोबर शशिकलांच्या स्वागतासाठी उपस्थित असलेल्या अनेक नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे सत्र सुरू झाले आहे.
शशिकलांचं असंही स्वागत : पाऊल घरात पडण्याआधीच नातेवाईकांच्या मालमत्तांवर टाच
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्या 15 फेब्रुवारी 2017 रोजी तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरण आल्या होत्या. त्या कर्नाटकातील पराप्पना अग्रहार कारागृहात होत्या. शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची 27 जानेवारीला सुटका झाली आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने बंगळूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना 31 जानेवारीला रुग्णालयातून सोडण्यात आले. परंतु, कोरोना संसर्गामुळे त्यांना सात दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्या बंगळूरमध्ये विश्रांती घेत होत्या.
Edited by Sanjay Jadhav

