भाजपच्या राज्यात चार महिन्यांत दुसऱ्या मुख्यमंत्र्याची पडणार विकेट? - uttrakhand chief minister tirath singh rawat meets j p nadda in delhi | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

भाजपच्या राज्यात चार महिन्यांत दुसऱ्या मुख्यमंत्र्याची पडणार विकेट?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 जुलै 2021

भाजपची सत्ता असलेल्या उत्तराखंडमध्ये चार महिन्यांत दुसऱ्या मुख्यमंत्र्यांची विकेट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

नवी दिल्ली : उत्तराखंडचे (Uttarakhand) मुख्यमंत्री तिरथसिंह रावत (Tiath Singh Rawat) हे मागील तीन दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून बसले आले आहेत. आज त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा (J P Nadda) यांची भेट घेतली. यामुळे मुख्यमंत्र्यांवर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याने चार महिन्यांत दुसऱ्या मुख्यमंत्र्यांची विकेट पडणार का, याकडे लक्ष लागले आहे. 

रावत यांना 30 जूनला पक्ष नेतृत्वाने दिल्लीत बोलावून घेतले होते. तेव्हापासून ते दिल्लीत आहेत. रावत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याशी 30 जूनला सायंकाळपर्यंत चर्चा केली होती. आज पुन्हा रावत यांनी नड्डा यांची भेट घेतली. तिरथसिंह यांच्या आधी त्रिवेंद्रसिंह यांना पक्षांतर्गत मतभेदांमुळे राजीनामा द्यावा लागला होता. आता पुन्हा याची पुनरावृत्ती होण्याची चर्चा सुरू झाली आहे. 

हेही वाचा : पोटनिवडणुकीच्या तिढ्यामुळे मुख्यमंत्र्यांचे पद धोक्यात 

रावत यांच्या जागी मुख्यमंत्रिपदी आपली निवड व्हावी, यासाठी सत्पाल महाराज आणि धनसिंह रावत यांनी पक्ष नेतृत्वाकडे आग्रह धरला आहे. याआधी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह यांनाही आव्हान दिले होते. यामुळे नेतृत्वाने त्रिवेंद्रसिंह यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवले होते. आता त्यांनी तिरथसिंह यांच्याविरोधात मोहीम उघडली आहे. यामुळे चारच महिन्यांत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बदलला जाण्याची चर्चा जोर धरु लागली आहे. 

मुख्यमंत्री तिरथसिंह यांच्यावर पक्ष नेतृत्वही नाराज आहे. याला कारणीभूत आहेत त्यांची वादग्रस्त वक्तव्ये आणि कुंभमेळ्याच्या नियोजनात त्यांनी केलेल्या चुका. रावत यांनी महिलांनी रिप्ड जीन्स घालू नये, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. याचबरोबर भारतावर दोनशे वर्षे ब्रिटनने नव्हे तर अमेरिकेने राज्य केले, असा जावईशोधही त्यांनी लावला होता. कुंभमेळ्यास सहभागासाठी आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल आवश्यक नाही, असे विधान करुन त्यांनी मोठा वाद निर्माण केला होता. त्यांनी आपल्याच पक्षाच्या आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या धोरणांची चिरफाड केल्यानेही पक्ष नेतृत्वाची त्यांच्यावर नाराजी आहे. याचबरोबर त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे जनतेतही त्यांच्याबद्दल रोष आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख