पोटनिवडणुकीच्या तिढ्यामुळे चार महिन्यांतच मुख्यमंत्र्यांचे पद धोक्यात! - uttrakhand chief minister tirath singh rawat is in delhi for last 3 days | Politics Marathi News - Sarkarnama

पोटनिवडणुकीच्या तिढ्यामुळे चार महिन्यांतच मुख्यमंत्र्यांचे पद धोक्यात!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 जुलै 2021

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथसिंह रावत हे मागील तीन दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून बसले आले आहेत. 

नवी दिल्ली : उत्तराखंडचे (Uttarakhand) मुख्यमंत्री तिरथसिंह रावत (Tiath Singh Rawat) हे मागील तीन दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून बसले आले आहेत. पोटनिवडणुकीचा तिढा आणि सत्तारूढ भाजपमधील अंतर्गत वादामुळे चार महिन्यांतच त्यांच्या मुख्यमंत्रिपदावर टांगती तलवार आली आहे. राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपर्यंत रावत मुख्यमंत्रिपदी राहणार का याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. 

रावत यांना 30 जूनला पक्ष नेतृत्वाने दिल्लीत बोलावून घेतले होते. तेव्हापासून ते दिल्लीत आहेत. रावत हे खासदार आहेत. त्यांना मुख्यमंत्रिपदी कायम राहण्यासाठी विधानसभेवर निवडून येण्याची आवश्यकता आहे. राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत असून, पक्षांतर्गत मतभेदामुळे रावत यांना मार्चमध्ये मुख्यमंत्री नेमण्यात आले होते. रावत यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची वाचवण्यासाठी 10 सप्टेंबरपर्यंत विधानसभेवर निवडून जाण्याची अंतिम मुदत आहे. 

रावत यांच्या भवितव्याचा निर्णय निवडणूक आयोगाच्या हाती आहे. निवडणूक आयोगाने मात्र, निवडणुका घेण्याबाबत सावध भूमिका घेतली आहे. मार्च-एप्रिल महिन्यांत काही राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निवडणूक आयोग टीकेचा धनी बनला होता. अनेक राज्यांत पोटनिवडणुका प्रलंबित आहेत. मात्र, कोरोना संकटाच्या काळात निवडणुका घेण्यास आयोग राजी नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

हेही वाचा : गडकरी, जावडेकर, गोयल अन् इराणींचा भार होणार हलका 

या पार्श्वभूमीवर रावत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याशी 30 जूनला सायंकाळपर्यंत चर्चा केली. विधानसभा पोटनिवडणुकीबाबत अनिश्चितता निर्माण झालेली असताना रावत यांच्यासमोर आणखीही एक समस्या आहे. ही समस्या त्यांच्या आधीचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनाही होती. पक्षांतर्गत वादामुळेच त्यांना पद सोडावे लागले होते. आता विद्यमान मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी यामुळे वाढली आहे. 

त्रिवेंद्रसिंह रावत यांनी चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी तिरथसिंह रावत यांची निवड झाली. पक्षांतर्गत नाराजीमुळे त्रिवेंद्रसिंह यांना पायउतार व्हावे लागले होते. उत्तराखंड राज्याच्या निर्मितीपासून नारायणदत्त तिवारी वगळता एकाही मुख्यमंत्र्याला पदाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. याला त्रिवेंदसिंहही अपवाद ठरले नव्हते. त्यांना राज्यातील अपूर्ण कार्यकाळाची प्रथा मोडून काढण्यासाठी केवळ एक वर्षाचा कालावधी राहिला होता.  

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख