धक्कादायक : सरकारची मिक्सोपॅथी; कोरोनावरील किटमध्ये रामदेवबाबांचे कोरोनील - uttarakhand government adds ramdev coronil to covid 19 kit | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

धक्कादायक : सरकारची मिक्सोपॅथी; कोरोनावरील किटमध्ये रामदेवबाबांचे कोरोनील

वृत्तसंस्था
शनिवार, 5 जून 2021

योगगुरू रामदेवबाबा यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीच्या कोरोनील या औषधावरुन पुन्हा एकदा मोठा गदारोळ उडाला आहे. 

नवी दिल्ली : योगगुरू रामदेवबाबा (Ramdev) यांच्या पतंजली (Patanjali) आयुर्वेद कंपनीच्या कोरोनील (Coronil) या औषधावरुन पुन्हा एकदा मोठा गदारोळ उडाला आहे. या वादग्रस्त औषधाचा समावेश आता सरकारी कोरोना किटमध्ये (Covid-19 Kit) करण्यात आला आहे. याला इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) गंभीर आक्षेप घेतला असून, सरकारने अशा प्रकार मिक्सोपॅथीला प्रोत्साहन देऊ नये, असे सुनावले आहे. 

उत्तराखंडमधील भाजप सरकारने हा निर्णय घेतला आहे. याआधी हरियानातील भाजप सरकारने कोरोना किटमध्ये कोरोनीलचा समावेश केला होता. आता उत्तराखंडने त्याचे अनुकरण केले आहे. यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. रामदेवबाबांकडून अॅलोपॅथीबद्दल अपप्रचार सुरू असताना भाजपशासित राज्यांकडून त्यांना प्रोत्साहन दिले जात असल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

याबद्दल आयएमएच्या उत्तराखंड विभागाने म्हटले आहे की, अॅलोपॅथिक औषधांसोबत कोरोनाचा समावेश करणे हा मिक्सोपॅथीचा प्रकार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे अयोग्य असून, असे करणे न्यायालयाचा अवमान ठरू शकते. कोरोनीलला जागतिक आरोग्य संघटनेची (डब्लूएचओ) मान्यता नाही. याचबरोबर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या कोरोनावरील औषधांच्या यादीतही त्याचा समावेश नाही. 

हेही वाचा : कोरोना लशीचा असाही फायदा; आजीबाई ठरणार जगातील सर्वांत वृद्ध व्यक्ती 

योगगुरु रामदेवबाबा यांच्या कोरोनील या कोरोनावरील आयुर्वेदिक औषधावरून मोठा गदारोळ सुरू आहे. या औषधाला डब्ल्यूएचओची  मान्यता असल्याचा दावा रामदेवबाबांच्या पतंजलीने केला होता. मात्र, डब्ल्यूएचओने केलेल्या खुलाशानंतर हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले होते. या औषधावरुन इंडियन मेडिकल असोसिएशनने या प्रकरणी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना जाबही विचारला होता. 

रामदेवबाबांच्या पतंजली उद्योगसमूहाने बनविलेल्या कोरोनील या कथित आयुर्वेदिक औषधाला मान्यता दिलेली नाही, असे डब्ल्यूएचओने स्पष्ट केले होते. मात्र, त्याआधीच देशाचे आयुष मंत्रालय या औषधाला मान्यता प्रमाणपत्र देऊन मोकळे झाले होते. हे औषध जाहीरपणे सादर करताना डॉ. हर्षवर्धन व नितीन गडकरी यांच्यासारखे ज्येष्ठ केंद्रीय मंत्री हजर होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख