कोरोना लस घेण्याचा असाही फायदा; आजीबाई ठरल्या जगातील सर्वांत वृद्ध व्यक्ती

जम्मू आणि काश्मीरमध्ये कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू आहे. राज्यातील बारामुल्ला जिल्ह्यात एका 124 वर्षांच्या महिलेला कोरोना लस देण्यात आली आहे.
jammu and kashmir woman claims to be oldest living person in world
jammu and kashmir woman claims to be oldest living person in world

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमध्ये (Jammu And Kashmir) कोरोना लसीकरणाची (Covid Vaccination) मोहीम सुरू आहे. राज्यातील बारामुल्ला जिल्ह्यात एका 124 वर्षांच्या महिलेला कोरोना लस देण्यात आली आहे. सरकारच्या वतीने घरोघरी जाऊन लसीकरण केले जात आहे. कोरोना लस घेतल्यानंतर या वृद्धेचे वय समोर आले असून, ती जगातील सर्वांत वृद्ध व्यक्ती (World oldest person) असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

जम्मू आणि काश्मीरमधील 20 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत कोरोना लशीचे 33 लाख 58 हजार 4 डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर आणि नागरिक अशा 9 हजार 289 जणांना 2 जूनला कोरोना लस देण्यात आली. यात राही बेगम यांचा समावेश आहे. त्या 124 वर्षांच्या आहेत. राज्याच्या आरोग्य विभागानेच ट्विट करुन याची माहिती दिली. अधिकाऱ्यांचे म्हणणे मान्य केल्यास त्या जगातील सर्वांत वृद्ध व्यक्ती ठरल्या आहेत. 

गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार, जपानमधील केन तनाका या जगातील सर्वांत वृद्ध व्यक्ती असून, त्यांचे वय 118 आहे. आतापर्यंत सर्वांत वृद्ध व्यक्ती म्हणून ज्याँ लुई कॅलमाँट यांचा विक्रम आहे. त्यांचा फ्रान्समध्ये 122 वर्षे आणि 164 दिवस वय असताना मृत्यू झाला होता. आता राही बेगम यांच्या मुलाने रेशन कार्डवर केलेल्या नोंदीनुसार त्यांचे वय 124 आहे. या व्यतिरिक्त त्यांच्याकडे वयाचा कोणताही पुरावा नाही. परंतु, त्या सर्वांत वृद्ध व्यक्ती असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अधिकाऱ्यांनीही राही बेगम या 100 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या असल्याचे म्हटले आहे. परंतु, नेमके वय सांगण्यास असमर्थता दर्शवली आहे. 

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. परंतु, आता लस नसल्याने अनेक लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. 

सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाही लस दिली गेली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com