लस टंचाई कमी करण्याचे दिशेने पाऊल; 'सिरम'बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय - DCGI gave preliminary approval of sputnik v production to SII | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

लस टंचाई कमी करण्याचे दिशेने पाऊल; 'सिरम'बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

वृत्तसंस्था
शनिवार, 5 जून 2021

रशियाच्या स्पुटनिक व्ही या कोरोना प्रतिबंधात्मक लशीचे उत्पादन आता सिरम कंपनी सुरू करणार आहे.

नवी दिल्ली : जगातील आघाडीची लस उत्पादक कंपनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SII) आणखी एक महत्वाचं पाऊल टाकलं आहे. रशियाच्या स्पुटनिक व्ही (Sputnik V) या कोरोना (Covid-19) प्रतिबंधात्मक लशीचे (Covid Vaccine) उत्पादन आता कंपनी सुरू करणार आहे. त्यासाठी भारतीय औषध महानियंत्रकांनी कंपनीला प्राथमिक परवानगी दिली आहे. ही मान्यता मिळाल्याने स्पुटनिक व्ही लशीचे भारतात उत्पादन सुरू होऊन लशीचा तुटवडा कमी होऊ शकतो. 

सिरम इन्स्टिट्यूटकडून सध्या कोविशिल्ड या लशीचे उत्पादन घेतले जात आहे. ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठ व अॅस्ट्राझेनेका कंपनीने विकसित केली आहे. सिरमकडून नोव्हाव्हॅक्स कंपनीच्या कोव्होव्हॅक्स या लशीचे उत्पादन करण्यात येत आहे. पण अद्याप या लशीच्या वापरासाठी परवानगी मिळालेली नाही. स्पुटनिकला परवानगी मिळाल्याने सिरमकडील ही तिसरी लस ठरणार आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांच्याकडून लस उत्पादन वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच हा परिपाक आहे. 

हेही वाचा : भारताने टाकले अमेरिकेला मागे; कोरोना लसीकरणात मारली बाजी 

भारतात सध्या स्पुटनिक व्ही लस आयात करावी लागत आहे. नुकतेच या लशीचे सुमारे 30 लाख डोस भारतात आले आहे. डॅा. रेड्डीज या कंपनीकडून ही आयात करून वितरित केली जात आहे. लस आयात करावी लागत असल्याने त्याची किंमतही जवळपास एक हजार रुपये आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागिरकांच्या आवाक्याबाहेर आहे. तसेच मर्यादित स्वरूपातच लस येत असल्याने देशातील लशींच्या तुटवड्यावर त्याचा फारसा परिणाम होत नाही. 

सिरमने औषध महानियंत्रकांकडे लस उत्पादनाला परवानगी देण्याचा अर्ज केला होता. आता कंपनीला प्राथमिक परवानगी देण्यात आली आहे. या परवानगीमुळे सिरम आता ही लस विकसित करुन तिचे उत्पादन घेऊ शकणार आहे. हे उत्पादन चाचणीसाठी असणार आहे. ते सिरमला विकता येणार नाही. प्रत्यक्ष उत्पादन सुरु होण्यास काही महिन्यांचा कालावधी लागेल. सिरमकडून जून महिन्यापासून दर महिन्याला कोविशिल्ड लशीच्या 10 कोटी डोसचे उत्पादन केले जाणार आहे. 

वर्षभरात भारताला स्पुटनिक व्ही लशीचे सुमारे 85 कोटी डोस मिळतील, अशी अपेक्षा आहे. डॅा. रेड्डीज कंपनीकडून ऑगस्ट आणि डिसेंबर महिन्यात या लशीचे सुमारे 15 कोटींहून अधिक लस भारतातच बनविली जाणार आहे. सिरमला ही मान्यता मिळाल्यास भारताला स्पुटनिक लशीचे मोठ्या प्रमाणावर डोस उपलब्ध होऊ शकतात. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख