तालिबानने अमेरिकेला खडसावलं; धोका असेल तर आधी आम्हाला सांगा!

आत्मघातकी हल्ल्यामध्ये शंभरहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 13 जण अमेरिकेचे सैनिक आहेत.
US drone strike in Kabul is unlawful says Taliban
US drone strike in Kabul is unlawful says Taliban

काबूल : काबूल विमानतळाबाहेर इसिसने केलेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर अमेरिकेने कारवाईचा इशारा दिला होता. या हल्ल्यात अमेरिकेचे तेरा सैनिक मारले गेले आहेत. त्यामुळं चिडलेल्या अमेरिकेने हा हल्ला घडवून आणलेला सुत्रधार राहत असलेल्या अफगाणिस्तानातील घरावर ड्रोनद्वारे हल्ला केला. या हल्ल्यात काही नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या या कृतीवर तालिबानने अमेरिकेला खडसावलं आहे. (US drone strike in Kabul is unlawful says Taliban)

आत्मघातकी हल्ल्यामध्ये शंभरहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 13 जण अमेरिकेचे सैनिक आहेत. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी या हल्ल्याचा बदला घेण्याचा इशारा दिला होता. हा हल्ला करणाऱ्यांना शोधून मारले जाईल, असं त्यांनी म्हटलं होतं. इसिसनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अमेरिकेनं लगेचच ड्रोनद्वारे हल्ल्याची तयारी केली. त्यानुसार हल्ल्याचा सुत्रधार राहत असलेल्या घरावर ड्रोनद्वारे बॉम्ब हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात हा सुत्रधार मारला गेल्याचा दावा अमेरिकेने केला. तसंच हल्ल्यात काही नागरिकही मारले गेले आहेत. 

अमेरिकेच्या हल्यात नागरिक मारले गेल्याचे समोर आल्यानंतर तालिबानने त्यावर आक्षेप घेतला आहे. हा हल्ला बेकायदेशीर असल्याचा दावा तालिबानने केला आहे. अमेरिकेने या कारवाईबाबत तालिबानाला कळवलं नसल्यानं नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तालिबानचे प्रवक्ते झबिहुल्लाह मुजाहिद म्हणाले, सात लोकांना या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. अमेरिकेची ही दुसऱ्या देशातील कारवाई बेकायदेशीर आहे. अफगाणिस्तानमध्ये खरंच काही हल्ला होण्याची शक्यता असेल तर ते आधी आम्हाला सांगायलं हवं. थेट हल्ला करून सामान्य लोकांचा जीव घेणं चुकीचं आहे. 

 पेंटगॉनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, काबूल विमानतळावर आणखी एक आत्मघातकी हल्ला होण्याची भीती होती. त्याची तयारी सुरु होती. इसिसचे स्थानिक दहशतवादी हे तालिबानप्रमाणेच आमचेही शत्रु आहेत. हल्ला करण्यात आलेल्या घरामध्ये अधिकची स्फोटकं असण्याची शक्यता आहे. त्यामुळंच मोठा स्फोट होऊन अपेक्षेपेक्षा अधिक नुकसान झाले. 

दरम्यान, तालिबानने अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्यासाठी 31 ऑगस्ट ही अंतिम मुदत दिली आहे. त्यामुळं अमेरिकेसह इतर देशांना त्यांचे नागरिक तसेच अफगाणिस्तानमधून बाहेर पडून इच्छिणाऱ्या नागरिकांना नेण्यासाठी केवळ एकच दिवस उरला आहे. या कालावधीत ही मोहिम पूर्ण केली जाईल, असं अमेरिकेनंही स्पष्ट केलं आहे. तालिबानकडून एक सप्टेंबरनंतर कोणती भूमिका घेतली जाणार, याबाबत जगाचं लक्ष लागलं आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com