'ईडी'च्या रडारवर असलेले बजरंग खरमाटे कोण आहेत? - ED is conducting raid at Bajrang Kharmates home-rm82 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

'ईडी'च्या रडारवर असलेले बजरंग खरमाटे कोण आहेत?

वृत्तसंस्था
सोमवार, 30 ऑगस्ट 2021

ईडीनं खरमाटे यांच्या घरावर छापा टाकला आहे.

मुंबई : प्रादेशिक परिवहन विभागातील निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी विभागात होत असलेल्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार, बदल्यांमधील आर्थिक व्यवहार, अनियमितता याबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यामध्ये परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह बजरंग खरमाटे यांचंही नाव आहे. खरमाटे हे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आहेत. खरमाटे हे परब यांच्या अत्यंत जवळचे अधिकारी असल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळंच ईडीनं खरमाटे यांच्या घरावर छापा टाकला असल्याचं वृत्त आहे. (ED is conducting raid at Bajrang Kharmates home)

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडीकडून मनी लाँर्डींग प्रकरणात चौकशी केली जात आहे. आता याच प्रकरणात ईडीकडून अनिल परब यांचीही चौकशी सुरू केली आहे. परब यांना ईडीनं रविवारी नोटीस पाठवली असून सोमवारी खरमाटे यांच्या घरासह तीन ठिकाणी छापे टाकले. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून परब यांच्या अडचणी वाढल्याची चर्चा आहे. गजेंद्र पाटील यांनी केलेल्या तक्रारीमध्ये परब यांच्यासह खरमाटे यांचंही नाव घेण्यात आलं आहे. 

हेही वाचा : IAS अधिकाऱयाचं वादग्रस्त वक्तव्य अन् भाजप-काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांमध्येच जुंपली

खरमाटे यांचे नाशिक कनेक्शन समोर आलं आहे. आरटीओ विभागातील बदल्या आणि पदोन्नतीसंदर्भात ईडीने छापेमारी केली आहे. खरमाटे हे परब यांच्या जवळचे मानले जात असल्यानं त्यांचा परिवहन विभागात सतत राबता असायचा. यापूर्वीही त्यांच्याविरोधात तक्रारी झाल्या आहेत. खरमाटे पेण आणि सोलापूर येथे असताना दोन वेळा निलंबित झाले होते. बदली व पदोन्नतीसाठी त्यांच्या मुंबई व पुण्यात सतत फेऱ्या होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याअनुषंगाने खरमाटे हे ईडीच्या रडारवर आले आहेत. 

दरम्यान, गजेंद्र पाटील यांनी केलेल्या तक्रारीमध्ये परब यांच्यासह खरमाटे, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, उप परिवहन आयुक्त जितेंद्र कदम, उपसचिव प्रकाश साबळे, परिवहन विभागाचे अवर सचिव डी. एच. कदम, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांची नावे घेण्यात आली होती. पाटील यांच्या तक्रारीनंतर नाशिकच्या पोलिस आयुक्तांकडून चौकशी समितीही नेमण्यात आली होती. नाशिकच्या हद्दीत असा कोणताही गुन्हा घडला नसल्याचा अहवाल आयुक्तांना देण्यात आला होता. 

सचिन वाझेनेही केले होते आरोप

बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यानेही अनिल परब यांच्यावर आरोप केले होते. त्यांनी मुंबई पालिकेतील ठेकेदारांकडून पैसे गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता. तसेच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा जबाब त्यांनी पत्र लिहून न्यायदंडाधिकाऱ्यांना दिला होता.  मुंबई महापालिकेतील वादग्रस्त 50 कंत्राटदारांकडून प्रत्येक दोन कोटी रुपये गोळा करण्याचे काम परब यांनी सांगिल्याचा दावा वाझे यांनी केला होता.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख