जिल्हाधिकारी साहेब, माझ्या कोरोना पॉझिटिव्ह भावाला बेड द्या हो! केंद्रीय मंत्र्यानेच फोडला टाहो

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. मागील 24 तासांत देशात 2 लाख 73 हजार कोरोना रुग्ण सापडले आहेत. उत्तर प्रदेशात तर अतिशय भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
union minister of state v k singh demands bed for his covid positive brother
union minister of state v k singh demands bed for his covid positive brother

लखनौ : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे.  देशात काल (ता.18) 2 लाख 73 हजार कोरोना रुग्ण सापडले असून, 1 हजार 619 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता केंद्रीय मंत्र्याच्या भावालाच उपचारासाठी बेड मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या केंद्रीय मंत्र्याने यासाठी सोशल मीडियावर जिल्हाधिकाऱ्यांनाच हतबल होऊन कळवळून विनंती केली आहे. अखेर यावरुन मोठा गदारोळ झाल्याने केंद्रीय मंत्र्यांने हे ट्विटच डिलिट केले आहे. 

हा प्रकार व्ही.के.सिंह यांच्या बाबतीत घडला आहे. रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाचे राज्यमंत्री असणारे सिंह दुसऱ्यांदा केंद्रात मंत्रिपद भूषवत आहेत. त्यांच्या भावाला कोरोनाचा संसर्ग झाला होता आणि त्यांना उपचारासाठी बेड मिळत नव्हता. त्यांनी यामुळे थेट त्यांचाच मतदारसंघ असलेल्या उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना थेट सोशल मीडियावरुन आवाहन केले. 

जिल्हाधिकारी साहेब माझ्या भावाला कोरोना संसर्ग झाला असून, उपचारांसाठी रूग्णालयात बेड मिळण्याची गरज आहे. सध्या या भागात कुठल्याही रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत. कृपया माझी मदत करा, असे आवाहन सिंह यांनी केले होते. यानंतर केंद्रीय मंत्र्यालाच कुटुंबीयाच्या उपचारासाठी हातापाया पडाव्या लागत असतील तर आपली काय गत होणार, अशी प्रतिक्रिया नेटिझन्स व्यक्त करु लागले. 

सिंह यांच्या या जाहीर विनंतीची दखल उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाने घेतली. त्यानंतर सूत्रे हलली आणि सर्व कार्यवाही झाली. परंतु, केंद्र आणि उत्तर प्रदेशातील भाजप सरकारला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लक्ष्य केले जाऊ लागले. यामुळे सिंह यांनी पहिले ट्विट डिलीट केले आणि दुसरे ट्विट केले. परंतु, तोपपर्यंत मोठमोठे दावे करणारे केंद्र आणि राज्य सरकारचे पितळ उघडे पडले होते. 

केंद्रात आणि उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार असताना भाजपकडून निवडून आलेला खासदार व केंद्रीय राज्यमंत्र्यावर अशी वेळ येत असेल इतरांची काय अवस्था असेल, अशी टीका सोशल मीडियावर केली जात आहे. कोरोना उद्रेकाच्या काळात स्वपक्षीय सरकार असूनही केंद्रीय मंत्र्यावर मदतीची जाहीर याचना करण्याची वेळ आली, अशा प्रतिक्रियांचा पाऊस ट्विटरवर पडला. 

सिंह यांचे घूमजाव ?
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाने लवकरात जिल्हाधिकारी तुमच्याशी संपर्क साधतील असे उत्तर सिंह यांना दिले. त्यानंतर काही काळातच मंत्री सिंह यांनी खुलासे करण्यास सुरवात केली. जिल्हाधिकाऱ्यांकडे मी भावासाठी रुग्णालयातील खाट उपलब्ध व्हावी, अशी मागणी केली नव्हती. अडचणीत सापडलेल्या कोरोना रुग्णासाठी मानवतेच्या भावनेतून मदत मागितली होती. संबंधित व्यक्ती माझा सख्खा भाऊ नाही आणि आमचे रक्ताचे नातेही नाही, असा खुलासा करीत सिंह यांनी पहिले ट्विट डिलीट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in