उपचारासाठी रुग्णालये अपुरी पडल्याने 'या' राज्यात सहा दिवस संपूर्ण लॉकडाउन - after covid cases rise total lockdown in delhi for seven days | Politics Marathi News - Sarkarnama

उपचारासाठी रुग्णालये अपुरी पडल्याने 'या' राज्यात सहा दिवस संपूर्ण लॉकडाउन

वृत्तसंस्था
सोमवार, 19 एप्रिल 2021

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. मागील 24 तासांत देशात 2 लाख 73 हजार कोरोना रुग्ण सापडले आहेत. 

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे.  देशात काल (ता.18) 2 लाख 73 हजार कोरोना रुग्ण सापडले असून, 1 हजार 619 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिल्लीतही कोरोना संसर्गाची भीषणता वाढत चालली असून, रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालये अपुरी पडू लागली आहेत. यामुळे दिल्लीत आज मध्यरात्रीपासून पुढील सहा दिवस संपूर्ण लॉकडाउन केला जाणार आहे. हा लॉकडाउन पुढील सोमवारी (ता.26) पहाटे पाचपर्यंत असणार आहे. 

दिल्लीत शनिवारी 24 हजार 375 रुग्ण सापडले असून, 167 मृत्यू झाले आहेत. यामुळे दिल्लीत नवीन कोरोना रुग्णांना दाखल करण्यासाठी रुग्णालये मिळत नसल्याचे चित्र आहे. ही परिस्थिती भीषण होऊ लागल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी हा लॉकडाउनचा निर्णय घेतला असल्याचे समजते. या काळात सर्व खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होम बंधनकारक असेल. सरकारी कार्यालये आणि अत्यावश्यक सेवा केवळ सुरू राहतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

दिल्लीत कोरोना चाचण्यांचा पॉझिटिव्हिटी दर 30 टक्के आहे. म्हणजेच, कोरोना चाचणी करणाऱ्या तीन जणांपैकी एक जण पॉझिटिव्ह येत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दिल्लीत आधी वीकएंड कर्फ्यू लावण्यात आला होता. यात शनिवारी आणि रविवारी निर्बंध घालण्यात आले होते. तरीही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने आता संपूर्ण लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे तातडीची मदत मागितली आहे. त्यांनी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. राजधानीतील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची अत्यंत मोठी टंचाई असून रुग्णालयांमध्ये आता अतिदक्षता कक्षांसह (आयसीयू) केवळ शंभर खाटा रिकाम्या आहेत. दिल्लीतील शाळांचे रूपांतर कोरोना उपचार केंद्रांमध्ये करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत.

लसीकरण मोहिमेत 45 वर्षे वयाची अट काढून टाकण्याची मागणी विविध राजकीय पक्षांकडून केंद्र सरकारकडे होऊ लागली आहे. परंतु, देशात सध्या लशीची टंचाई आहे. यामुळे अनेक राज्यांमध्ये लसीकरण केंद्रे बंद पडू लागल्याचे चित्र आहे. लसीकरणासाठी वयाची अट काढून टाकण्याचा निर्णय केंद्र सरकार पुढील आठवडाभरात घेणे अपेक्षित आहे, अशी  माहिती सूत्रांनी दिली. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख