मुख्यमंत्री येडियुरप्पा पायउतार झाल्यास सहा मंत्री राजीनामा देण्याच्या तयारीत?

मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांना पदावरुन हटवण्यासाठी पक्ष नेतृत्वाने हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे राजकीय अस्वस्थता निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री येडियुरप्पा पायउतार झाल्यास सहा मंत्री राजीनामा देण्याच्या तयारीत?
speculation of ministers will resign if chief minister yediyurappa ousted

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) भाजपमधील (BJP) अंतर्गत मतभेद दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांना पदावरुन हटवण्यासाठी पक्ष नेतृत्वाने हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे राजकीय अस्वस्थता निर्माण झाली असून, मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर सहा मंत्री तातडीने मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये गेले. हे मंत्री राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

येडियुरप्पांच्या राजीनाम्याची चर्चेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. येडियुरप्पांना पक्ष नेतृत्वाने राजीनामा द्यायला लावल्यास काही मंत्री राजीनामा देतील, अशी चर्चा सुरू आहे. यात काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) आघाडी सरकारमधून भाजपमध्ये आलेल्या मंत्र्यांचा समावेश असेल, अशी चर्चा सुरू आहे. याचबरोबर येडियुरप्पांनी राजीनामा दिल्यास भाजपमध्ये फूट पडेल, अशहीही चर्चा सुरू आहे.  

मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर सहा मंत्री तातडीने मुख्यंत्र्यांच्या केबिनमध्ये गेले. यामुळे हे मंत्री राजीनामा देणार असल्याच्या बातम्या स्थानिक वृत्तवाहिन्यांनी देण्यास सुरवात केली. यामुळे मोठी राजकीय खळबळ उडाली. अखेर या मंत्र्यांना राजीनामा देणार नसल्याचे जाहीर करावे लागले. पक्षाचे नेतृत्व सांगेल तो निर्णय आम्हाला मान्य असेल, असेही त्यांनी सांगितले. असे असले तरी येडियुरप्पा मुख्यमंत्री पदावरुन पायउतार होईपर्यंत कर्नाटकात राजकीय अस्थितरतेची चिन्हे दिसू लागली आहेत. 
 
हेही वाचा : ह्यांचा जन्म झाला त्यावेळी मी सीमेवर लढत होतो! मुख्यमंत्र्यांचा प्रदेशाध्यक्षांना चिमटा 

भाजपची विधिमंडळ बैठक 25 जुलैला होणार असून, यात येडियुरप्पांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. येडियुरप्पांच्या राजीनाम्याबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले होते. त्यामुळे त्यांनी अखेर मौन सोडले होते. ते म्हणाले होते की, मला पक्षाचे केंद्रीय नेतृत्व 25 जुलैला जो आदेश देईल, त्याचे पालन मी करेन. मी माझे काम 26 जुलैपासून सुरू करेन. राज्यातील भाजप सरकारला 2 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त 26 जुलैला कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर पक्षश्रेष्ठी देतील त्या आदेशाचे मी पालन करेन. 

येडियुरप्पा हे 78 वर्षांचे आहेत. त्यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाकडून पावले उचलण्यास सुरवात झाली आहे. येडियुरप्पा यांना यासाठी मागील आठवड्यात दिल्लीलाही बोलावून घेण्यात आले होते. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही येडियुरप्पा यांनी भेट घेतली. या भेटीत येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. यासाठी येडियुरप्पांनी प्रकृतीचे कारण पुढे केले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in