आता आमची काय 10-15 वर्षे राहिली, आम्हाला नको तरुणांना कोरोना लस द्या!

देशात कोरोना लसीकरणाचादुसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येत आहे.
senior congress leader mallikarjun kharge denies covid vaccine
senior congress leader mallikarjun kharge denies covid vaccine

नवी दिल्ली : देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. सोमवारपासून (ता.1) 60 वर्षांवरील नागरिक आणि दुर्धर आजार असलेल्या 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस दिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांनी कोरोना लस घेतली आहे. मात्र, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी आधी तरुणांना लस देण्याची मागणी केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) कोरोना लशीचा पहिला डोस घेतला. या लसीकरणाबाबत स्वतः पंतप्रधानांनी ट्विट करुन माहिती दिली होती. कोरोनाच्या जागतिक महामारीमध्ये आपल्या डॉक्टरांनी आणि शास्त्रज्ञांनी केलेले काम उल्लेखनीय असल्याचे सांगत पंतप्रधानांनी या सर्वांचे कौतुक केले होते. लस घेण्यास पात्र आहेत, त्या सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी मात्र, कोरोना लस घेण्यास नकार दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आता माझे वय 70 वर्षांपेक्षा जास्त आहे. तुम्ही ही लस तरुणांना द्यायला हवे. त्यांचे आयुष्य वाढवण्याची गरज आहे. माझी काय 10 ते 15 वर्षे राहिली आहेत. तरुणांना आणखी आयुष्य जगायचे आहे. आधी त्यांना लस द्या मग मीही लस घेईन. 

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास 16 जानेवारीला देशात सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन झाले होते. केंद्र सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. 

आता दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दिली जात आहे. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांचाही यात समावेश आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत मिळेल मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागतील. यात 100 रुपयांच्या सेवा शुल्काचा समावेश असेल, असे सरकारने जाहीर केले आहे.  

सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  सध्या दोन कोरोना लशी उपलब्ध असून, आणखी सात कोरोना लशींवर काम सुरू असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com