पतीच्या पावलावर पत्नीचे पाऊल... 'सिरम'च्या नताशा पूनावालांनी घेतली कोरोना लस!

देशात कोरोना लसीकरणाचादुसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येत आहे.
serum institutes natasha poonawalla takes covid vaccine jab
serum institutes natasha poonawalla takes covid vaccine jab

नवी दिल्ली : देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. सोमवारपासून (ता.1) 60 वर्षांवरील नागरिक आणि दुर्धर आजार असलेल्या 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस दिली जात आहे. आज सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांच्या पत्नी नताशा पूनावाला यांनी कोरोना लस घेतली. या वेळी त्यांनी अभिमान वाटत असल्याची भावना व्यक्त केली. 

याआधी स्वत: अदर पूनावाला यांनी लस घेतली होती. त्यांनी कोव्हिशिल्ड ही लस घेतली. ही लस अॅस्ट्राझेन्का आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने विकसित केली असून, सिरम इन्स्टिट्यूट तिचे उत्पादन करीत आहे. नताशा या कंपनीच्या कार्यकारी संचालक आहेत. त्यांनी इन्स्टाग्रामवर याची माहिती दिली आहे.  सोशल मीडियावरील पोस्टमध्ये पूनावाला यांनी म्हटले आहे की, गॅवी वॅक्सिन अलायन्सचे प्रमुख सेथ बर्कले, जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, गेट्स फाउंडेशन आणि बिल गेट्स यांनी कोव्हिशिल्ड लस ही जागतिक पातळीवरील कोव्हॅक्स कार्यक्रमासाठी वितरीत होईल यासाठी प्रयत्न केले. 

सिरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वांत मोठी लस उत्पादक कंपनी आहे. अॅस्ट्राझेन्का लशीच्या कोट्यवधी डोसचे उत्पादन कंपनी करीत आहेत. जगभरातील अनेक गरीब देश कंपनीच्या लशींवर अवलंबून आहेत. कंपनीने आधीच अनेक देशांना लशीचा पुरवठा केला आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काल दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) कोरोना लशीचा पहिला डोस घेतला. या लसीकरणाबाबत स्वतः पंतप्रधानांनी ट्विट करुन माहिती दिली होती. कोरोनाच्या जागतिक महामारीमध्ये आपल्या डॉक्टरांनी आणि शास्त्रज्ञांनी केलेले काम उल्लेखनीय असल्याचे सांगत पंतप्रधानांनी या सर्वांचे कौतुक केले होते. लस घेण्यास पात्र आहेत, त्या सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास 16 जानेवारीला देशात सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन झाले होते. केंद्र सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. 

आता दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दिली जात आहे. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांचाही यात समावेश आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत मिळेल मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागतील. यात 100 रुपयांच्या सेवा शुल्काचा समावेश असेल, असे सरकारने जाहीर केले आहे.  

सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  सध्या दोन कोरोना लशी उपलब्ध असून, आणखी सात कोरोना लशींवर काम सुरू असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले होते. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी ही माहिती दिली होते. प्रत्येक भारतीयाला ही लस देण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com