पक्षही माझा अन् दोन पानाचे चिन्हही माझंच; आयोगाच्या विरोधात शशिकला जाणार सर्वोच्च न्यायालयात - sasikala will move to supreme court for two leave symbol of aiadmk | Politics Marathi News - Sarkarnama

पक्षही माझा अन् दोन पानाचे चिन्हही माझंच; आयोगाच्या विरोधात शशिकला जाणार सर्वोच्च न्यायालयात

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

शशिकला यांच्या सुटकेने राज्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्यास सुरवात झाली आहे. 

चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांच्या सुटकेनंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्यास सुरवात झाली आहे. अण्णाद्रमुक पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि दोन पानाचे निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी यांच्या गटाला दिले होते. आता या निर्णयाला शशिकला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. 

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्या 15 फेब्रुवारी 2017 रोजी तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरण आल्या होत्या. त्या कर्नाटकातील पराप्पना अग्रहार कारागृहात होत्या. शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची 27 जानेवारीला सुटका झाली आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने बंगळूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना 31 जानेवारीला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. 

शशिकलांची अण्णाद्रमुक पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यावेळी पक्षात दोन गट पडून पक्षावर नेमका कुणाचा अधिकार हा वाद झाला होता. त्यानंतर 23 नोव्हेंबर 2017 रोजी निवडणूक आयोगाने  मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील गटाला पक्षाचे चिन्ह दिले होते.  हा वाद नंतर सर्वोच्च न्यायालयात गेला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाने पक्षाचे नाव आणि दोन पानाचे चिन्ह पलानीस्वामी गटाला दिले होते. 

शशिकलांना लोकप्रतिनिधित्व कायद्याचा आधार

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार  याचिका दाखल करण्यासाठी शशिकलांनी पावले उचलली आहेत. याबद्दल बोलताना शशिकलांचे वकील राजा सेंथूर पांडियन म्हणाले की, या प्रकरणी आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आम्ही या प्रकरणी याचिका दाखल केली नव्हती. याचबरोबर शशिकलांची सुटका होण्याची प्रतीक्षा आम्ही करीत होतो. 

या पार्श्वभूमीवर शशिकलांचे भाचे व आमदार टी.टी.व्ही. दिनकरन यांनी खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर माझी आत्या शशिकला यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी डिसेंबर 2016 मध्ये बिनविरोध निवड झाली होती. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यांना सर्व राजकीय निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. पुढील आठवडाभर कोरोना संसर्गामुळे त्या विलगीकरणात राहतील आणि त्यानंतर त्या पुढील दिशा ठरवतील. 

शशिकलांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषत: अण्णाद्रमुक पक्षात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. शशिकलांच्या सुटकेमुळे राज्यात बदलणाऱ्या राजकीय समीकरणांचा धसका मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या गटांनी एकत्र येऊन शशिकलांच्या विरोधात रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. 

शशिकला मुख्यमंत्री व्हाव्यात यासाठी पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, नंतर कारागृहात जाण्याआधी त्यांनी एडापड्डी पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री बनवले होते. यामुळे पनीरसेल्वम यांनी बंड केले होते. नंतर दोघांमध्ये समेट होऊन ते शशिकलांच्या विरोधात एकत्र आले होते. त्यांनी शशिकला तुरुंगात असताना त्यांची आणि त्यांचे भाचे टी.टी.व्ही.दिनकरन यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख