शशिकलांना लोकप्रतिनिधित्व कायद्याचा आधार; निवडणूक लढता येणार नाही पण नेतृत्व करु शकणार

शशिकला यांची तब्बल चार वर्षांनंतर कारागृहातून सुटका झाली आहे. त्यांच्या सुटकेने राज्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्यास सुरवात झाली आहे.
sasikala can not contest election but head party under representative act
sasikala can not contest election but head party under representative act

चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांची तब्बल चार वर्षांनतर कारागृहात सुटका झाली आहे. शशिकलांच्या सुटकेनंतर राज्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्यास सुरवात झाली आहे. लोकप्रतिनिधित्व कायद्यातील तरतुदीमुळे त्यांना 27 जानेवारी 2027 पर्यंत विधानसभा अथवा लोकसभा निवडणूक लढवता येणार नसली तरी त्यांना पक्षाचे नेतृत्व करता येणार आहे.

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्या 15 फेब्रुवारी 2017 रोजी तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरण आल्या होत्या. त्या कर्नाटकातील पराप्पना अग्रहार कारागृहात होत्या. शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची 27 जानेवारीला सुटका झाली आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने बंगळूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना काल (ता.31 जानेवारी) रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. 

लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 च्या कलम 8 अंतर्गत एखाद्या गुन्ह्यात शिक्षा झाल्यानंतर ती व्यक्ती निवडणूक लढवण्यास अपात्र ठरते. कलम 8 (1) नुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत झालेल्या शिक्षेचाही समावेश यात करण्यात आला आहे. यामुळे ही तरतूद शशिकलांसाठी लागू ठरते. 

लोकप्रतिनिधित्व कायद्यातील तरतुदीनुसार एखाद्या व्यक्तीला दहशतवादी कारवाया, बलात्कार, महिला अत्याचार करणे आणि दोन गटांत शत्रूत्व निर्माण करणे अशा प्रकारांमध्ये दंडात्मक शिक्षा झालेल्यांना शिक्षेच्या तारखेपासून पुढे सहा वर्षे निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले जाते. मात्र, अशा प्रकरणांमध्ये कारावासाची शिक्षा झालेल्यांना शिक्षेचा कालावधी आणि तो पूर्ण झाल्यानंतर पुढे सहा वर्षे निवडणूक लढता येत नाही. शशिकलांना कारावास आणि दंड झाल्याने त्यांना पुढील सहा वर्षे विधानसभा अथवा लोकसभा निवडणूक लढता येणार नाही. 

या पार्श्वभूमीवर शशिकलांचे भाचे व आमदार टी.टी.व्ही. दिनकरन यांनी खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर माझी आत्या शशिकला यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी डिसेंबर 2016 मध्ये बिनविरोध निवड झाली होती. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यांना सर्व राजकीय निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. पुढील आठवडाभर कोरोना संसर्गामुळे त्या विलगीकरणात राहतील आणि त्यानंतर त्या पुढील दिशा ठरवतील. 

शशिकलांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषत: अण्णाद्रमुक पक्षात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. शशिकलांच्या सुटकेमुळे राज्यात बदलणाऱ्या राजकीय समीकरणांचा धसका मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या गटांनी एकत्र येऊन शशिकलांच्या विरोधात रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. 

शशिकला मुख्यमंत्री व्हाव्यात यासाठी पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, नंतर कारागृहात जाण्याआधी त्यांनी एडापड्डी पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री बनवले होते. यामुळे पनीरसेल्वम यांनी बंड केले होते. नंतर दोघांमध्ये समेट होऊन ते शशिकलांच्या विरोधात एकत्र आले होते. त्यांनी शशिकला तुरुंगात असताना त्यांची आणि त्यांचे भाचे टी.टी.व्ही.दिनकरन यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com