शशिकला यांचा पुन्हा राजकीय गेम? अण्णाद्रमुकच्या खेळीनं अडचणी वाढणार

माजी मंत्र्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्याने पुन्हा एकदा तमिळनाडूतील राजकारण तापलं आहे.
Sasikala in truble after FIR lodged against her over death threat
Sasikala in truble after FIR lodged against her over death threat

चेन्नई : तमिळनाडूच्या (Tamilnadu) राजकारणात व्ही. के. शशिकला यांच्या पुनरागमानाच्या संकेत मिळत असताना त्या पुन्हा अडचणी सापडल्या आहेत. जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री जयललिता (Jaylalitha) यांच्या निधनानंतर शशिकला यांची अण्णाद्रमुक मधून हकालपट्टी करण्यात आली. आता याच पक्षातील माजी मंत्र्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाल्याने पुन्हा एकदा तमिळनाडूतील राजकारण तापलं आहे. (Sasikala in truble after FIR lodged against her over death threat)

अण्णाद्रमुकचे माजी कायदा मंत्री सी. व्ही. शन्मुगम यांनी ही तक्रार दिली आहे. शशिकला व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोबाईलवर अनेकवेळा संपर्क साधला. शशिकला यांच्याविरोधात माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर मोबाईलवरून जीवे मारण्याची धमक्या सुरू झाल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. जवळपास 500 हून अधिक कॅाल आले असून सोशल मीडियातूनही धमकी देण्यात आली आहे, असा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

तमिळनाडूमध्ये शशिकला यांनी अण्णाद्रमुकच्या काही पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्याची ऑडिओ क्लीप नुकतीच व्हायरल झाली आहे. त्यानंतर अण्णाद्रमुकमध्ये खळबळ उडाली. याच क्लीपची दखल घेत पक्षाकडून कठोर कारवाई करण्यात आली. शशिकला यांच्याशी बोलल्याचा ठपका 16 पदाधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये पक्षाच्या प्रवक्त्यांचाही समावेश आहे. त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचे आरोप करत पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. शशिकला यांच्या समर्थकांना एकप्रकारे इशारा देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा होती.

या ऑडिओ क्लीपमध्ये शशिकला आपण लवकरच परत येणार असल्याचे संकेत देताना दिसत आहेत. ही क्लीप व्हायरल झाल्यानंतर अण्णाद्रमुकमधील नेते सतर्क झाले असून पदाधिकाऱ्यांना शशिकलांशी बोलण्यासही मनाई करण्यात आली. आता त्यांच्याविरोधात जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शशिकला पुन्हा एकदा अडचणीत आल्या आहेत. त्यांची राजकारणात परतण्याची वाट खडतर असल्याचे यावरून स्पष्ट झालं आहे. 

काय म्हणाल्या होत्या शशिकला?

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपमध्ये शशिकला या आपण परत येणार असल्याचे संकेत देतात. 'चिंता करू नका, मी पक्षातील समस्या लवकरच दूर करेन. सगळ्यांनी धीट बनवा. कोरोना महामारी संपल्यानंतर मी परत येईन,' असे त्या अण्णाद्रमुकच्या पदाधिकाऱ्याशी बोलताना म्हणाल्या होत्या. त्यावर त्या पदाधिकाऱ्यानेही आम्ही तुमच्या पाठिशी राहू, असे आश्वासनही त्यांना दिले होते.

कोण आहेत शशिकला?

जयललिता यांच्या निधनानंतर शशिकलांनी पनीरसेल्वम यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा घेतला होता. नंतर कारागृहात जाण्याआधी त्यांनी एडापड्डी पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री बनवले होते. यामुळे पनीरसेल्वम यांनी बंड केले होते. नंतर दोघांमध्ये समेट होऊन ते शशिकलांच्या विरोधात एकत्र आले होते. त्यांनी शशिकला तुरुंगात असताना त्यांची आणि त्यांचे भाचे टी.टी.व्ही.दिनकरन यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. 

शशिकलांच्या सुटकेनंतर त्यांना पक्षात न घेण्यास मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांचा सर्वांत जास्त विरोध होता. पलानीस्वामी हे सरकारचे नेतृत्व करीत आहेत तर पनीरसेल्वम हे पक्षाचे नेतृत्व करीत आहेत. काही दिवसांपूर्वी पनीरसेल्वम यांनी शशिकलांना पुन्हा एकदा पक्षात येण्याचे निमंत्रण दिले होते. यामागे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष अडचणीत आल्याचे कारण आहे. मात्र, शशिकलांनी याला कोणताही प्रतिसाद दिला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com