भाजप नेत्या साध्वी प्राची यांचं मोहन भागवतांना प्रत्यूत्तर; सर्वांचा डीएनए सारखा, पण... - Same DNA except those who eat cow meat says Sadhvi Prachi on Mohan Bhagwat | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप नेत्या साध्वी प्राची यांचं मोहन भागवतांना प्रत्यूत्तर; सर्वांचा डीएनए सारखा, पण...

वृत्तसंस्था
रविवार, 11 जुलै 2021

सर्व भारतीयांचा डीएनए सारखाच आहे. मग तो कोणत्याही धर्माचा असो, असं वक्तव्य भागवत यांनी केलं होतं.

दिल्ली : 'सर्व भारतीयांचा डीएनए सारखाच आहे,' असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतंच केलं होतं. विरोधकांनी त्यावर जोरदार टीका केली आहे. तर भाजपने या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. पण भाजप नेत्या साध्वी प्राची यांनी भागवत यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत त्यांना प्रत्यूत्तर दिलं आहे. सर्व भारतीयांचा डीएनए सारखा आहे पण गोमांस खाणाऱ्यांचा नाही, असं त्या म्हणाल्या आहेत. (Same DNA except those who eat cow meat says Sadhvi Prachi on Mohan Bhagwat)

गाजियाबाद येथे मुस्लिम राष्ट्रीय मंचतर्फे आयोजित एका कार्यक्रमात मोहन भागवत यांनी डीएनएबाबत वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, सर्व भारतीयांचा डीएनए सारखाच आहे. मग तो कोणत्याही धर्माचा असो. मॅाब लिंचिंगमध्ये जे लोक सहभागी असतात, ते हिंदुत्वाच्या विरूध्द आहेत. लोकशाही हिंदू किंवा मुस्लिमांचे प्रभुत्व असू शकत नाही, असेही भागवत म्हणाले होते. 

हेही वाचा : म्हणून सेनाभवनात पुन्हा सैनिकांचा बंदोबस्त

भागवत यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना साध्वी प्राची म्हणाल्या, 'सगळ्यांचा डीएनए एक आहे, पण जे गोमांस खातात त्यांचा नाही.' त्यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या दोन मुलांच्या धोरणावरही भाष्य केलं आहे. संसदेत लोकसंख्या नियंत्रणावर कायदा करायला हवा. अन्यथा धोका निर्माण होईल.

दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांच्या सरकारी सुविधा बंद करायला हव्यात. त्यांचा मतदानाचा अधिकारही काढून घ्यायला हवा. एका व्यक्तीला कितीही पत्नी असल्या तरी मुलं दोन हवीत, असंही वक्तव्य साध्वी प्राची यांनी केलं आहे. लव जिहादवर बोलताना साध्वी म्हणाल्या, राजस्थामध्ये लव जिहादच्या नावाखाली मुलींना अडकत त्यांचं धर्मांतर केलं जात आहे. काँग्रेसने मतांच राजकारण सोडत हिंदू मुलींना वाचविण्यावर लक्ष द्यावं. 

दरम्यान, मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर काँग्रेसनं टीका केली आहे. काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह म्हणाले, मोहन भागवत आपले विचार त्यांचे शिष्य, प्रचारक, विश्व हिंदू परिषद, बजरग दलाच्या कार्यकर्त्यांनाही सांगतील का? हीच शिकवण तुम्ही मोदी-शाह व भाजपच्या मुख्यमंत्र्यांनाही देणार का? तुम्ही व्यक्त केलेल्या विचारांवर ठाम असाल तर निर्दोष मुस्लिमांना त्रास दिलेल्या भाजपमधील नेत्यांना तात्काळ हटवण्याचे आदेश द्या, असे दिग्विजय सिंह म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख