तेरापैकी बारा अपक्ष आमदार म्हणाले, आमचा पाठिंबा मुख्यमंत्र्यांनाच!

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्यातील वाद पुन्हा उफाळला आहे. यात आता अपक्ष उमेदवारांनी उडी मारली आहे.
rajasthan independent mlas support chief minister ashok gehlot
rajasthan independent mlas support chief minister ashok gehlot

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि काँग्रेस (Congress) नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वाद पुन्हा उफाळला आहे. आता काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांनी बैठक घेऊन जाहीरपणे गेहलोत यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. यामागे गेहलोत यांचीच खेळी असून, त्यांनी सरकारवर आपलंच वर्चस्व असल्याचे पक्ष नेतृत्वाला दाखवून दिल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. 

सरकारला  पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांची बैठक काल (ता.23) बोलावण्यात आली होती. राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीवर या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत सरकारला पाठिंबा देणारे 13 पैकी 12 अपक्ष आमदार या बैठकीला उपस्थित होते. ही बैठक सुमारे तासभर चालली आणि त्यात मुख्यमंत्री गेहलोत यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शविण्यात आला.  या बैठकीनंतर बोलताना अपक्ष आमदार सनयाम लोढा म्हणाले की, विधानसभेत आणि विधानसभेबाहेर आम्ही कायम सरकारला मजबूत करण्याचे काम केले आहे. राज्यात स्थिर सरकार असावे, अशी आमची इच्छा आहे. 

हे सर्व आमदार गेहलोत गटाचे आहेत. पायलट यांनी केलेल्या बंडावेळी हे सर्व आमदार गेहलोत यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले होते. पक्ष नेतृत्वाने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यामुळे पायलट यांनी नुकताच दिल्ली दौरा केला होता. यानंतर पक्ष नेतृत्वाने पायलट यांच्या कलाने घेण्यास सुरवात केली आहे. यामुळे गेहलोत यांच्या कंपूत नाराजी निर्माण झाली आहे. पक्ष नेतृत्वावर दबाव आणण्यासाठी गेहलोत यांनी आता सहयोगी आणि अपक्ष आमदारांना हाताशी धरण्याची खेळी खेळली आहे. 

राज्य सरकारने अनेक महामंडळांवरील नियुक्त्या सुरू केल्या आहेत. याचबरोबर मंत्रिमंडळ विस्ताराच्याही हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्व आहे. पायलट यांच्या गटातील आमदारांना जास्तीतजास्त प्रतिनिधित्व मंत्रिमंडळ आणि महामंडळांमध्ये मिळावे, अशी मागणी होत आहे. यातच बहुजन समाज पक्षातून काँग्रेसमध्ये आलेल्या 6 आमदारांनीही पक्षाच्या नेतृत्वाकडे काही मागण्या केल्या आहेत. मागील वर्षीपासून त्यांना काहीही मिळाले नाही, अशी या आमदारांची नाराजी आहे. 

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. मागील वर्षी पायलट यांच्यासह त्यांच्या 18 समर्थक आमदारांनी बंड केल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून त्यांना काही आश्वासनं देण्यात आली होती. पण ही आश्वासनं अद्याप पूर्ण न झाल्यानं पायलट यांची नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील जितिन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशानंतर पायलट यांच्या भाजप प्रवेशाबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com