रजनीकांत यांचा राजकारणाला 'फुल स्टॉप'; राजकीय संघटनाही केली विसर्जित - Rajanikanth says I have no plans of entering politics in future | Politics Marathi News - Sarkarnama

रजनीकांत यांचा राजकारणाला 'फुल स्टॉप'; राजकीय संघटनाही केली विसर्जित

वृत्तसंस्था
सोमवार, 12 जुलै 2021

रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय रद्द केला होता. पण ते पुन्हा राजकारणात येतील, अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. 

चेन्नई : सुपरस्टार रजनीकांत (Rajanikanth) यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी रद्द केला होता. ते पुन्हा राजकारणात येतील, अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. परंतु, रजनीकांत यांनी या सर्व चर्चांना विराम देत राजकारणाला फुल स्टॉप दिला आहे. त्यांनी रजनी मक्कल मंद्रम (Rajani Makkal Mandram) ही राजकीय संघटनाही विसर्जित करुन टाकली आहे. 

रजनीकांत यांनी रजनी मक्कल मंद्रम ही राजकीय संघटना विसर्जित केली आहे. ती विसर्जित करण्यापूर्वी त्यांनी संघटनेच्या सदस्यांसोबत शेवटचा संवाद साधला. ही संघटना 2018 मध्ये स्थापन करण्यात आली होती. ती आता रजनीकांत रासीगर नरपणी मंद्रम म्हणजेच रजनीकांत फॅन्स वेलफेअर फोरममध्ये विसर्जित करण्यात आली आहे. 

या वेळी 70 वर्षांच्या रजनीकांत यांनी भविष्यात राजकारणात जाण्याचे नियोजन नाही, असे स्पष्ट केले. यामुळे रजनीकांत यांच्या आयुष्यातील राजकारणाचा चॅप्टर आता संपला आहे. रजनीकांत यांनी 2018 मध्ये राजकीय संघटना स्थापन केली, त्यावेळी 30 वर्षांनी पुन्हा एकदा ते राजकारणात येणार अशी अटकळ बांधली जात होती. या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या तमिळनाडूतील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रजनीकांत या राजकारण प्रवेशाचे मागील वर्षी नियोजन केले होते. परंतु, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी हा निर्णय मागील वर्षी डिसेंबर महिन्यात रद्द केला होता. 

हेही वाचा : पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला जनता वैतागलीय! गडकरींचा केंद्राला घरचा आहेर 

रजनीकांत यांच्या रक्तदाबात जास्त चढउतार झाल्याने डिसेंबर महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करणार नाही, असे जाहीर केले होते. त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. रजनीकांत यांनी म्हटले होते की, मी अतिशय खेदाने सांगू इच्छितो की मी राजकारणात प्रवेश करणार नाही. हा निर्णय जाहीर करताना मला किती दु:ख होत आहे हे मला एकट्यालाच माहिती आहे. 

मी राजकारणात प्रवेश न करता लोकांची सेवा करीत राहीन. माझ्या या निर्णयामुळे माझे चाहते आणि जनता नाराज असेल परंतु, त्यांनी मला माफ करावे. मी रुग्णालयात दाखल होणे हा देवाने दिलेला इशारा होता. कोरोना संकटाच्या काळात याचा माझ्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असे रजनीकांत यांनी म्हटले होते. रजनीकांत यांनी राजकारणातील प्रवेश रद्द करण्यामागे प्रकृतीचे कारण आहे. त्यांच्या प्रकृतीवर मागील काही दिवसांत आलेला ताण पाहून त्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांना जास्त ताण न घेण्याचा सल्ला दिला होता. याचबरोबर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचेही हेच म्हणणे होते.

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख