धक्कादायक : अटक टाळण्यासाठी राज कुंद्राने मुंबई पोलिसांना दिले 25 लाख रुपये? - raj kundra allegedly paid 25 lakh rupees to mumbai police to evade arrest-sj84 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

धक्कादायक : अटक टाळण्यासाठी राज कुंद्राने मुंबई पोलिसांना दिले 25 लाख रुपये?

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 22 जुलै 2021

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पॉर्न फिल्मची निर्मिती करुन त्यांचे वितरण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पॉर्न फिल्मची निर्मिती करुन त्यांचे वितरण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, राज कुंद्राने अटक टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी 25 लाख रुपयांची लाच दिल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या रॅकेटमधील आरोपी यश ठाकूर आणि आणखी एका आरोपीला याने यासंदर्भात ई-मेल केले होते. अटक टाळण्यासाठी राज कुंद्राने मुंबई पोलिसांनी 25 लाख रुपये घेतले असून, माझ्याकडूनही तेवढीच रक्कम मागितली जात आहे, असे त्याने ई-मेलमध्ये म्हटले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश ठाकूरचे 4 ई-मेल मिळाले होते. याबाबत कोणतेही पुरावे हाती आलेले नव्हते. त्यामुळे चौकशीसाठी हे ई-मेल मुंबई पोलिसांकडे 20 एप्रिलला पाठवण्यात आले होते. 

राज कुंद्रा याच्या विरोधात पुरेसे पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून, या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याच्या दिशेने पोलिसांनी पावले टाकली आहेत. पॉर्न व्हिडीओ बनवून ते ऑनलाईन अपलोड करणा-या रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने राज कुंद्रा याला अटक केली. त्याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात तो मुख्य सूत्रधार आहे.या प्रकरणातील पीडितांनी पुढे येऊन गुन्हे शाखेशी संपर्क करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

कुंद्रा याच्यानंतर नेरुळमधून रायन थार्प याला अटक करण्यात आली आहे. कुंद्राने एका कंपनीच्या माध्यमातून 30 ते 40 अॅप्सची निर्मिती केलेली आहे. या कंपन्यांवर काही दिवस तो स्वतः संचालक राहायचा आणि नंतर राजीनामा देऊन विश्वासातील व्यक्तीला तिथे नेमायचा.  त्याने ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या शेकडो अश्लील व्हिडिओंचा डेटा मुंबई पोलिसांच्या हाती लागला आहे. या प्रकरणात आणखी 2 मॉडेल गुन्हे शाखेच्या रडारवर आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

हेही वाचा : सिद्धूंचे बंड यशस्वी होताच पायलट यांनी हाय कमांडवर टाकला डाव 

चित्रपटाच्या शूटिंगच्या नावाखाली मढ बेटावरील खासगी बंगल्यांमध्ये वेश्याव्यवसाय आणि पॉर्न व्हिडीओचे शूटिंग होत असल्याची माहिती पोलिसांना फेब्रुवारीमध्ये मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यावेळी या बंगल्यांवर छापे टाकले होते. तरुण मुलींना चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून काही टोळ्या अश्लील व्हिडीओमध्ये काम करायला लावत होत्या. या छाप्यादरम्यान पोलिसांनी दोन मुलींची सुटका केली होती. 

त्यावेळी छाप्यात पोलिसांनी उमेश कामत, यास्मीन बेग खान, प्रतिभा नलावडे, मोनू गोपालदास जोशी, भानुसूर्यम ठाकूर आणि मोहम्मद आसिफ यांना अटक केली होती. त्यात पुढे गहना वशिष्ठ आणि सागरिका शोना सुमन यांनाही अटक करण्यात आली होती. फेब्रुवारी 2021 मध्ये घडलेल्या या गुन्ह्याचा पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर या संपूर्ण गुन्ह्यामागे मुख्य आरोपी उद्योगपती राज कुंद्रा असल्याचे समोर आले होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख