'पिगॅसस'चा धुमाकूळ; दोन केंद्रीय मंत्र्यांसह राहुल गांधी, प्रशांत किशोर यांचा फोन हॅक - Rahul Gandhi Prashant Kishor Ashwini Vaishnaw allegedly among targets of Pegasus Spyware | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

'पिगॅसस'चा धुमाकूळ; दोन केंद्रीय मंत्र्यांसह राहुल गांधी, प्रशांत किशोर यांचा फोन हॅक

वृत्तसंस्था
सोमवार, 19 जुलै 2021

काही सुरक्षा यंत्रणांचे आजी-माजी प्रमुख, अधिकारी, काही उद्योजकांचाही त्यात समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : पिगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून देशभरातील नामांकित पत्रकारांचे फोन हॅक करून त्यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर या यादीत आता खुद्द माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह आणखी एका केंद्रीय मंत्री, तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर, तृणमुलचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांचीही नावं असल्याचं वृत्त आहे.  संसदेच्या पावसाळी अधिवेशनादिवशीच ही माहिती उघड झाल्यानं केंद्र सरकारविरोधात विरोधकांनी रान उठवलं आहे. (Rahul Gandhi Prashant Kishor Ashwini Vaishnaw allegedly among targets of Pegasus Spyware)

इस्राईलमधील ‘एनएसओ ग्रुप’ कंपनीने पेगॅसिस स्पायवेअर तयार केला आहे. पॅरिस येथील ‘फॉर्बिडन स्टोरीज’ आणि अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थांनी ही बाब उघडकीस आणत ५० हजार मोबाईल क्रमांकाची यादीच तयार केली. ही माहिती त्यांनी जगभरातील इतर १६ वृत्तसंस्थांना  दिली. या यादीनुसार शोध घेतल्यानंतर ५० देशांमधील एक हजारांहून अधिक जणांवर पाळत ठेवल्याबाबतचे पुरावे मिळाले. ‘एनएसओ’ने ज्यांना हे स्पायवेअर विकले होते, त्यांच्याकडूनच पाळत ठेवण्याचा प्रकार घडला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा : सरकार पडेल असं रोज सकाळी वाटतं पण संध्याकाळ होईपर्यंत टिकतं!

सुरूवातीला भारतातील 40 पत्रकारांचे फोन हॅक केल्याची माहिती भारतातील एका वृत्तसंस्थेने दिली होती. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव प्रल्हाद पटेल यांच्यासह राहुल गांधी, प्रशांत किशोर, अभिषेक बॅनर्जी, अशोक लवासा यांच्यासह काही सुरक्षा यंत्रणांचे आजी-माजी प्रमुख, अधिकारी, काही उद्योजकांचाही त्यात समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. अनेक वृत्तसंस्थांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यांच्या मोबाईल क्रमांकांना लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीआधी 2018-19 मध्ये लक्ष्य करण्यात आले होते, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. 

पिगॅससवरून संसद व संसदेबाहेरही जोरदार वाद निर्माण झाला आहे. यावर वैष्णव यांनी संसदेत खुलासा केला. त्यांनी खुलासा केल्यानंतर काही वेळातच खुद्द त्यांचेच नाव या अहवालात असल्याचे समोर आलं. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. वैष्णव यांचा नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. ते 2018-19 मध्येच खासदार झाले आहेत. 

प्रशांत किशोर यांनी 2014 मध्ये भाजपच्या प्रचाराची रणनीती आखली होती. यावर्षी भाजपने बहुमत मिळवत सत्ता काबीज केली होती. त्यानंतर किशोर यांनी भाजप वगळून अनेक राजकीय पक्षांसाठी कामं केलं आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि तमिळनाडूत एम. के. स्टॅलिन यांच्यासाठी काम केलं. माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात आलेल्या तक्रारींबाबत आयोगाने दिलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. त्यांचाही फोन हॅक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख