भगतसिंह कोश्यारी यांचे 'ओएसडी' घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ - Pushkar Singh Dhami had OSD of former CM Bhagat Singh Koshyari | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

भगतसिंह कोश्यारी यांचे 'ओएसडी' घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

वृत्तसंस्था
रविवार, 4 जुलै 2021

केवळ दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आणि एकदाही मंत्रीपद न मिळालेले पुष्करसिंह धामी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत.

डेहराडून : केवळ दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आणि एकदाही मंत्रीपद न मिळालेले पुष्करसिंह धामी उत्तराखंडचे (Uttarakhand) नवे मुख्यमंत्री होणार आहेत. तिरथसिंह रावत यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर शनिवारी धामी यांच्या नावार शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजपमधील काही बड्या नेत्यांना मागे टाक धामी यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडल्याने आश्चर्यही व्यक्त केले जात आहे. (Pushkar Singh Dhami had OSD of former CM Bhagat Singh Koshyari)

धामी यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर उत्तराखंडमधील भाजपच्या काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे समजते. पण धामी यांच्यामागे मोठी राजकीय ताकद असल्याचेही बोलले जात आहे. धामी यांनी उत्तराखंडच्या खाटिमा मतदारसंघातून सलग दोन वेळा विजय मिळविला. ते 2012 ते 2017 पर्यंत आमदार होते आणि त्यानंतर 2017 मध्ये झालेल्या उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत त्यांना विजय मिळाला. 

हेही वाचा : ठाकरे सरकारला झोडपणाऱ्या फडणवीसांनी केलं राजेश टोपेंचं कौतुक

महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंह कोश्यारी यांचे धामी हे निकटवर्ती मानले जातात. कोश्यारी हे मुख्यमंत्री असताना धामी त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (OSD) होते. धामी हे उत्तराखंडचे सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री ठरणार आहेत. ते सध्या 45 वर्षांचे आहेत. 

खाटिमा विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार असलेल्या धामी हे राज्यातील तरुण चेहरा आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अगदी जवळचे मानले जातात. धामी हे उत्तराखंडमधील भाजपच्या युवा मोर्चाचे 2002 ते 2008 पर्यंत अध्यक्ष होते. धामी यांना तीन बहिणीही आहेत. त्यांचे वडील भारतीय सैन्यात होते. धामींचा जन्म पिथौरागडच्या तुंडी या गावी झाला. मानव संसाधन व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंधात त्यांनी पीजी आणि एलएलबी शिक्षण पूर्ण केले आहे.

धामी यांना केवळ काही महिन्यांसाठी मुख्यमंत्री पदावर राहता येणार आहे. पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यातच कोरोना संकट घोंघावत असल्यानं धामी यांना कमी कालावधीत मोठं आव्हान राहणार आहे. चार महिन्यांत दोन मुख्यमंत्री बदलल्याने पक्षांतर्गत नाराजीचा सामनाही धामी यांना करावा लागणार आहे. काही ज्येष्ठ नेते नाराज असल्याची चर्चाही आहे. त्यांनाही सोबत घेऊन काम करणे, धामी यांच्यासाठी तारेवरची कसरत असेल. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख