ठाकरे सरकारला झोडपणाऱ्या फडणवीसांनी केलं राजेश टोपेंचं कौतुक!

देशातील सर्वाधिक रुग्ण, मृत्यू महाराष्ट्रात आहेत. त्यावरून फडणवीस यांच्याकडून सातत्याने टीका केली जाते.
Devendra Fadnavis praised Rajesh Tope for his work during Corona period
Devendra Fadnavis praised Rajesh Tope for his work during Corona period

मुंबई : कोरोना काळात ठाकरे सरकारला विविध मुद्यांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी धारेवर धरलं. देशातील सर्वाधिक रुग्ण, मृत्यू महाराष्ट्रात आहेत. त्यावरून फडणवीस यांच्याकडून सातत्याने टीका केली जाते. कोरोनाचे मृत्यू लपविल्याचा आरोप केला जात आहे. रुग्णालयांमधील असुविधा, लसीकरणात नियोजन नाही, असे आरोप अनेकदा करण्यात आले. पण आज फडणवीस यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे कौतुक केलं आहे. अधिवेशनाच्या तोंडावर हा कौतुक सोहळा रंगला होता. (Devendra Fadnavis praised Rajesh Tope for his work during Corona period)

मुंबई झालेल्या एका कार्यक्रमात फडणवीस यांच्यासह टोपे व सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेही उपस्थित होते. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, कोरोना काळात प्रत्येकाने आपल्यापरीने चांगले काम केले आहे. या काळात मी महाराष्ट्रात तीनवेळा दौरा केला. रुग्णालयांत गेलो, डॅाक्टरांना भेटलो. ते एकटे नाहीत, याचा विश्वास त्यांना वाटायला हवा होता. राजेश टोपे यांनीही या काळात स्वत: दौरे केले, प्रचंड मेहनत केली. लोकांपर्यंत कसं पोहचता येईल, हा प्रयत्न त्यांनी केला. त्यांच्यात आणि आमच्यात काही विवाद असू शकतात. पण टोपेंच्या हेतूबद्दल मात्र कोणी शंका घेणार नाही. त्यांचेही विशेष अभिनंदन आम्ही करतो, असं कौतुक फडणवीस यांनी केलं. पण जी कामं राहिली असतील त्याच्यावर अधिवेशनात बोलणारच आहे, असा सूचक इशाराही फडणवीस यांनी दिला.  

तरूणाची आत्महत्या दुर्दैवी

एमपीएससी परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मुलाची आत्महत्या अत्यंत दुर्दैवी आहे. दोनवेळा ते परीक्षा उत्तीर्ण झाले. दुसऱ्यांचा अंतिम परीक्षा झाली नाही. पहिल्या परिक्षेची मुलाखत झाली नाही. हे खूप गंभीर आहे. कुठेतरी एमपीएमससीच्या कार्यप्रणालीचे पुनरावलोकन होण्याची आवश्यकता आहे. ज्याप्रकारे विलंब होतोय, मुलाखती होत नाही, अनेक पदं रिक्त आहेत, आयोगाचे सदस्य भरलेले नाहीत, हे योग्य नाही. मुलं अत्यंत अपेक्षेने परीक्षा देतात. दोन-दोन वर्षे मुलाखतच झाली नाही तर अशी निराशा येते. आम्ही एमपीएससीला स्वायत्तता दिली आहे. पण स्वायत्तता म्हणजे स्वैराचार नाही. सरकारनेही एमपीएससीच्या कारभाराचा आढावा घेत पूर्ण परिवर्तन करण्याचा प्रयत्न करावा, असे फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

मनातला उद्रेक कसा थांबवणार?

सोलापूरात मराठा आंदोलकांना पोलिसांनी अडविल्याच्या मुद्यावर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, सरकार पोलिसांच्या भरवशावर आंदोलनांना थांबवू शकेल पण त्यांच्या मनातल्या भावना कशा थांबवणार? कोरोना काळात जीव धोक्यात घालून मोर्चे काढण्याची इच्छा कुणालाही नाही. पण मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतरही समाजाची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. हा विषय राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठवून त्या आयोगानं मराठा समाज मागास कसा आहे, हा अहवाल दिल्याशिवाय पुढील कार्यवाही कोणीच करू शकत नाही. सरकारने अद्याप आयोगाकडं हा विषय दिलेलाच नाही. म्हणून हा उद्रेक आहे. 

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर आता मराठा आरक्षण लगेच उद्या मिळणार नाही, हे स्पष्टच आहे. पण सरकारचं धोरणामुळं ते भविष्यातही कधी मिळेल, असं लोकांना वाटत नाही. लोकांना थांबवण्याऐवजी त्यांच्या मनातला उद्रेक कसा थांबवता येईल, याचा प्रयत्न सरकारने करावा, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

निजामाच्या काळातही कधी पताका खाली गेली नाही 

वारकऱ्यांना पताका खाली ठेऊन वारीत जा असे सांगण्यात येत आहे, यावर बोलताना फडणवीस म्हणाले, ही भागवत धर्माची पताका आहे. महाराष्ट्रामध्ये भागवत धर्माची पताका खाली ठेवण्यास सांगणं हे भुषणावह नाही. मोगलाई किंवा निजामाच्या काळातही भागवत धर्माची पताका कधी खाली गेली नाही. महाराष्ट्रात असे कुणी सांगत असेल तर ते योग्य नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com