काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग; प्रदेशाध्यक्षांनी तातडीने बोलावली आमदारांची बैठक

बंड शमवण्यासाठी पक्षाने आतापर्यंत केलेले सर्व उपाय नाकामी ठरले आहेत.
Punjab Congress president calls meeting of party MLAs on Monday
Punjab Congress president calls meeting of party MLAs on Monday

नवी दिल्ली : पंजाब (Punjab)  काँगेसमधील (Congress) संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांच्या विरोधात काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu)  यांनी उघड बंड पुकारले आहे. हे बंड शमवण्यासाठी पक्षाने आतापर्यंत केलेले सर्व उपाय नाकामी ठरले आहेत. आता प्रदेशाध्यक्षांनी राज्यातील पक्षाचे सर्व आमदार व जिल्हाध्यक्षांची सोमवारी (ता. 19) बैठक बोलावली आहे. (Punjab Congress president calls meeting of party MLAs on Monday)

पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष सुनील जाखड यांनी ही बैठक बोलावली असून त्यामध्ये सिद्धू यांच्या भवितव्याचा फैसला होण्याची शक्यता आहे. या बैठकीत होणारा निर्णय काँग्रेसच्या हंगांमी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठविला जाणार आहे. त्यावर गांधी यांच्याकडून जो निर्णय होईल तो प्रदेश काँग्रेसला मान्य असेल, असे जाखड यांनी म्हटलं आहे. काही आमदारांनी सिद्धू यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतल्याने ही बैठक बोलावण्यात आल्याचे समजते. 

आमदारांच्या बैठकीआधी रविवारी काँग्रेसच्या पंजाबमधील खासदारांचीही बैठक बोलावण्यात आली आहे. दिल्लीत खासदार प्रताप सिंह बाजवा यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. शेतकऱ्यांशी संबंधित विविध मुद्यांसह काँग्रेसमधील काही मुद्यांवरही या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याचे बाजवा यांनी सांगितले. या बैठकीत सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्ष करण्यास विरोध केला जाऊ शकतो. बैठकीनंतर सोनिया गांधीही या खासदारांशी व्हर्चुअल माध्यमातून संवाद साधणार असल्याचे समजते. 

दरम्यान, सिद्धू यांना प्रदेशाध्यक्षपद देण्याच्या प्रस्ताव पक्षाने ठेवला होता. यावर कॅप्टन नाराज झाले आहेत. त्यांनी याबद्दल पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्र लिहिले होते. कॅप्टन यांनीही नुकतीच सोनिया गांधी यांची  भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी पक्षाच्या अध्यक्षा सांगतील तो तोडगा मान्य असेल, असे म्हटले होते. कॅप्टन यांचे पत्र मिळताच पक्ष नेतृत्वाने तातडीने रावत यांना शनिवारी चॉपरने पंजाबमध्ये पाठवले. पक्षातील बंड शमवण्याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.

सिद्धूंना अद्याप प्रदेशाध्यक्ष करण्याचा निर्णय घेतला नसल्याची भूमिका पक्षाने घेतली आहे. यामागे कॅप्टन यांनी नोंदवलेला विरोध कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. यामुळेच तातडीने सिद्धू यांना सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या भेटीला बोलावण्यात आले. कॅप्टन आणि सिद्धू यांच्या वादात पक्ष नेतृत्वही कात्रीत सापडल्यासारखे झाले आहे. 

पंजाबमधील अंतर्गत वाद विधानसभा निवडणुकीआधी पक्षाला परवडणारा नसल्याने नेतृत्वाने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपद मागितले होते. पक्षाने मात्र, त्यांना प्रचारप्रमुखाची जबाबदारी देण्याची तयारी दर्शविली होती. सिद्धू हे प्रदेशाध्यक्षपदावर ठाम होते. अखेर सिद्धू यांची मागणी पक्षाच्या नेतृत्वाने मान्य केल्याची चर्चा सुरू झाली होती. विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांना हटवले जाईल. सिद्धू यांच्यासोबत दोन कार्यकारी अध्यक्ष दिले जातील. यातील एक दलित आणि एक हिंदू असेल, असा तोडगा समोर आला होता. परंतु, याला कॅप्टन यांचा विरोध आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून वाद सुरू आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसच्या विजयानंतर पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी याला विरोध केल्याने सिद्धू यांना दुसरे मंत्रालय देण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचा वाद सुरू असून, आता सिद्धू यांनी उघड बंड पुकारले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com