काँग्रेसमधील असंतुष्टांना पुन्हा मानाचे स्थान; सोनिया गांधींनी घेतला महत्वाचा निर्णय

काँग्रेस नेत्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
Congress interim President Sonia Gandhi reconstituted parliamentary groups
Congress interim President Sonia Gandhi reconstituted parliamentary groups

नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेतृत्वात बदल करण्यासोबत पक्ष संघटनेची फेररचना करावी, अशी मागणी करणारे पत्र 23 ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिले होते. यावरुन मोठा गदारोळ उडाला होता. आता या 'जी 23' गटातील काही नेत्यांना मानाचे स्थान देण्यात आले आहे. सोनिया गांधी यांनी संसदीय गटाची पुर्नरचना केली असून त्यात या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. (Congress interim President Sonia Gandhi reconstituted parliamentary groups) 

संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवार (ता. 19) पासून सुरू होत आहे. यापार्श्वभूमीवर हा गट स्थापन करण्यात आला आहे. काँग्रेस नेत्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. लोकसभेतील सात सदस्यांमध्ये शशी शरूर (Shashi Tharoor) व मनीष तिवारी (Manish Tiwari) या असंतुष्टांना स्थान देण्यात आले आहे. लोकसभेतील पक्षनेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chawdhary) यांना बदलले जाण्याची चर्चा सुरू होती. पण चौधरी यांना पद टिकवण्यात यश मिळालं आहे.

आसामचे माजी मुख्यमंत्री तरूण गोगोई यांचे पुत्र गौरव गोगोई हे लोकसभेतील उपनेते म्हणून कायम असतील. के. सुरेश, रवनीत सिंह बिट्टू आणि मनिकम टागोर यांना या सात सदस्यांमध्ये स्थान देण्यात आले आहे. राज्यसभेमध्येही मल्लिकार्जून खर्गे हेच पक्षनेते असतील. तर जी 23 मध्ये समावेश असलेले आनंद शर्मा यांना उपनेता म्हणून स्थान देण्यात आले आहे. त्यांच्यासह राज्यसभेत जयराम रमेश, अंबिका सोनी, पी. चिदंबरम, दिग्विजय सिंह आणि के. सी. वेणुगोपाल यांचा सात सदस्यांच्या गटात घेण्यात आले आहे. 

सोनिया गांधी यांच्या पत्रामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. संसद अधिवेशनादरम्यान या गटातील नेते दररोज भेटून संसदेतील विविध मुद्यांवर चर्चा करतील. गरज भासल्यास लोकसभा व राज्यसभेतील सदस्यांची संयुक्त बैठकही होऊ शकते. मल्लिकार्जुन खर्गे संयुक्त बैठकांचे संयोजक असतील. अधिवेशनादरम्यान काँग्रेसकडून वाढती महागाई, इंधन दरवाढ, कोरोना काळात सरकारला आलेले अपयश आदी मुद्यांवर सरकारला घेरण्यात येणार आहे. 

दरम्यान, जी 23 मधील नेत्यांनी उघडपणे बंडाची भाषा केल्याची टीका पक्षातूनच त्यांच्यावर करण्यात आली होती. यावर पक्षाच्या कार्यकारी समितीची बैठक होऊन पक्ष संघटनेत तातडीने फेरबदल करण्याचा निर्णय झाला होता. याचबरोबर तळापासून संघटनेत निवडणुका घेण्याचेही ठरले होते. मात्र, पक्षाने कोणतीही पावले अद्याप उचललेली नाहीत. 

काँग्रेसमधील नाराजी व्यक्त करणाऱ्या नेत्यांमध्ये कपिल सिब्बल यांच्यासह 23 नेत्यांचा समावेश होता. या 'जी 23' नेत्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये शांती संमेलनही घेतले होते. या वेळी माजी खासदार गुलाम नबी आझाद, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, राज्यसभा खासदार विवेक तंखा, लोकसभा खासदार मनीष तिवारी आणि हरियानाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हूडा आदी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com