सिद्धूंनी आशीर्वाद मागताच कॅप्टन अमरिंदरसिंगांची 'टी डिप्लोमसी'!

पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील वाद अद्याप शमलेला नाही.
punjab cm amarinder singh invites all mla and mps for tea
punjab cm amarinder singh invites all mla and mps for tea

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) आणि काँग्रेस (Congress) नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांच्यातील वाद अद्याप शमलेला नाही. उद्या (ता.23) सिद्धू हे प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. त्याआधी मुख्यमंत्र्यांनी पक्षाचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांना चहाला बोलावण्याची खेळी खेळली आहे. 

सिद्घू हे उद्या प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. याचबरोबर चार कार्याध्यक्षही पदभार स्वीकारतील. या कार्यक्रमाचे निमंत्रण सिद्धू यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, माझी नियुक्ती ही सोनिया गांधी यांनी केली आहे. माझी तुमच्या विरोधात भूमिका नाही. लोकांच्या बाजूची माझी भूमिका आहे. तुम्ही पंजाब काँग्रेसमधील ज्येष्ठ आहात. त्यामुळे तुम्ही उद्याच्या कार्यक्रमाला येऊन काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीली आशीर्वाद द्यावेत. 

सिद्धू वगळता मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या नवीन चार कार्यकारी अध्यक्षांची आज भेट घेतली. सिद्घू यांनी पदभार घेण्याआधी सर्व आमदार, खासदार आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना चहाला बोलावण्याची खेळी मुख्यमंत्र्यांनी खेळली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार रवीन ठुकराल यांनी ट्विट केले. त्यांनी म्हटले आहे की, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदार, खासदार आमि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी उद्या सकाळी 10 वाजता पंजाब भवनला चहासाठी बोलावले आहे. त्यानंतर तेथून सगळे मिळून नवीन कार्यकारिणीच्या पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावतील. 

सिद्धू यांनी काल (ता.21) 62 आमदारांसह सुवर्णमंदिराला भेट दिली. काँग्रेसचे एकूण 77 आमदार असून, केवळ 15 आमदार या वेळी हजर नव्हते. यामुळे ते मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या गटातील असल्याचे मानले जात होते. सिद्धू यांनी आज केलेल्या या शक्तिप्रदर्शनामुळे पंजाबमध्ये तेच कॅप्टन असल्याचे सिद्ध झाले आहे. पक्ष नेतृत्वाने सिद्धू यांना बढती देऊन मुख्यमंत्र्यांना शह दिल्याचे मानले जात आहे. पक्ष नेतृत्वाच्या वरदहस्तामुळे सिद्धू यांनी पक्षातील बहुतांश आमदार आपल्याकडे वळवून घेतले आहेत. 

मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून वाद सुरू आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसच्या विजयानंतर पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी याला विरोध केल्याने सिद्धू यांना दुसरे मंत्रालय देण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचा वाद सुरू असून, आता सिद्धू यांनी उघड बंड पुकारले होते. 

पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल यांनी सिद्धू यांची पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. याचबरोबर चार कार्यकारी अध्यक्ष नेमण्यात आले आहेत. हिंदू आणि दलित असा समतोल साधत या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात संगतसिंग गिलझियान, सुखविंदरसिंग डॅनी, कुलजित नागरा आणि पवन गोयल यांचा समावेश आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com