नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासोबत असलेले काँग्रेसचे आमदार सीआयडीच्या रडारवर - punjab congress mlas supporting navjot singh sidhu are on cid radar-sj84 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासोबत असलेले काँग्रेसचे आमदार सीआयडीच्या रडारवर

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 जुलै 2021

पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील वाद अद्याप शमलेला नाही. 

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) आणि काँग्रेस (Congress) नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu)  यांच्यातील वाद अद्याप शमलेला नाही. प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यानंतर सिद्धू यांनी शक्तिप्रदर्शन केले होते. त्यावेळी पक्षातील 62 आमदार हजर होते. यातील अनेक आमदार गुन्हे अन्वेषण विभागाच्या  (CID) रडारवर आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सिद्धू यांनी काल (ता.21) 62 आमदारांसह सुवर्णमंदिराला भेट दिली. काँग्रेसचे एकूण 77 आमदार असून, केवळ 15 आमदार या वेळी हजर नव्हते. यामुळे ते मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या गटातील असल्याचे मानले जात होते. सिद्धू यांनी आज केलेल्या या शक्तिप्रदर्शनामुळे पंजाबमध्ये तेच कॅप्टन असल्याचे सिद्ध झाले आहे. पक्ष नेतृत्वाने सिद्धू यांना बढती देऊन मुख्यमंत्र्यांना शह दिल्याचे मानले जात आहे. पक्ष नेतृत्वाच्या वरदहस्तामुळे सिद्धू यांनी पक्षातील बहुतांश आमदार आपल्याकडे वळवून घेतले आहेत. 

सिद्धू यांच्यासोबत असलेले आमदारांपैकी काही आमदार सीआयडीच्या रडारवर आहेत. त्यांच्यावर बेकायदा धंदे, बेकायदा खाणकाम आणि बेकायदा दारुविक्री आदी आरोप आहेत. त्यांची सीआयडीकडून चौकशी सुरू आहे. त्यांनी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्याकडे मदतही मागितली होती. परंतु, मुख्यमंत्र्यांनी मदत न केल्याने हे आमदार आता सिद्धू यांच्या गटात सामील झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सिद्धू यांच्या घरी हे आमदार जमले होते. त्यावेळी साध्या वेशातील सीआयडीचे अधिकारी सिद्धू यांच्या निवासस्थानाबाहेर उपस्थित होते. त्यांची नजर या आमदारांवर होती. सिद्धू यांच्यासोबत असलेल्या अनेक आमदारांवर गंभीर आरोप आहेत. त्यामुळे मागील काही काळापासून सीआयडी त्यांच्या मागावर आहे, असेही सूत्रांनी सांगितले. 

हेही वाचा : शिवकुमार अन् सिद्धरामय्या वादात राहुल गांधींची मध्यस्थी पण...

मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून वाद सुरू आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसच्या विजयानंतर पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी याला विरोध केल्याने सिद्धू यांना दुसरे मंत्रालय देण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचा वाद सुरू असून, आता सिद्धू यांनी उघड बंड पुकारले होते. 

पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल यांनी सिद्धू यांची पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. याचबरोबर चार कार्यकारी अध्यक्ष नेमण्यात आले आहेत. हिंदू आणि दलित असा समतोल साधत या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात संगतसिंग गिलझियान, सुखविंदरसिंग डॅनी, कुलजित नागरा आणि पवन गोयल यांचा समावेश आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख