देशात पेट्रोल, डिझेलचा भडका अन् अर्थमंत्री सीतारामन म्हणतात, आमच्या हातात काही नाही! - nirmala sitharaman says government has no control over fuel prices | Politics Marathi News - Sarkarnama

देशात पेट्रोल, डिझेलचा भडका अन् अर्थमंत्री सीतारामन म्हणतात, आमच्या हातात काही नाही!

वृत्तसंस्था
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. मागील सलग बारा दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. 

नवी दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहे. अनेक राज्यांत पेट्रोलच्या दराने शंभरचा टप्पा ओलांडला आहे. यावरुन केंद्रातील भाजप सरकारला विरोधकांकडून लक्ष्य करण्यात येऊ लागले आहे.  इंधन दरवाढीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हात झटकले असून, सरकारच्या हातात काही नसल्याची भूमिका घेतली आहे. 

अनेक राज्यांत पेट्रोल प्रतिलिटर शंभर रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मागील 12 दिवसांत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3.63 रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3.84 रुपये वाढ झाली आहे. इंधन दरवाढीवरुन भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधक लक्ष्य करीत आहेत. यातून दिलासा देणारे कोणतेही पाऊल अद्याप केंद्र सरकारने उचललेले नाही. 

इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, पेट्रोलच्या वाढत्या दरावर सरकारने नियंत्रण ठेवावे की नाही, हा त्रासदायक मुद्दा आहे. यावर कोणतेही उत्तर दिले तरी ते पटण्यासारखे नाही. यावर सर्वांना पटणारे केवळ एकच उत्तर असून, ते म्हणजे दर कमी करणे. प्रत्यक्षात दराचा निर्णय तेल कंपन्या घेतात. यात सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही. सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरील नियंत्रण आधीच काढून टाकले आहे.  यामुळे सरकारचे दरावर कोणतेही नियंत्रण नाही. 

हेही वाचा : निर्मला सीतारामन म्हणतात, हे तर महाभयंकर धर्मसंकट...

तेल कंपन्याच खनिज तेलाची आयात करतात. त्याच त्याचे शुद्धिकरण करुन वितरीत करतात आणि त्याच त्याची किंमत ठरवतात. तेल उत्पादक देशांनी आगामी काळात तेल उत्पादन कमी होण्याचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे पुढील काळात पेट्रोलच्या दरात आणखी वाढ होऊ शकते, असा इशाराही सीतारामन यांनी दिला आहे. 

केंद्र सरकार प्रतिलिटर पेट्रोलमागे ३२.९0 रुपये एवढा कर आकारत आहे. महाराष्ट्र सरकार २६.७८ रुपये कर आकारत आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्था कोलमडली असल्याचे कारण देत केंद्र अथवा राज्य सरकार महसुलावर पाणी सोडण्यास तयार नाही. सलग बारा दिवस इंधन दरांत वाढ झाल्याने मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ९७ रुपयांवर पोचले होते. तसेच, डिझेल ८८.६ रुपये प्रतिलिटरवर पोचले होते. आज दरात कोणताही बदल झाली नाही. 

आज तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ न केल्याने दरात कोणताही बदल झाला नाही. दिल्लीत पेट्रोलचा दर आज प्रतिलिटर 90.58 रुपये आहे. याचवेळी डिझेलचा दर प्रतिलिटर 80.97 रुपये आहे. बंगळूरमध्ये  पेट्रोल प्रतिलिटर 93.61 रुपये तर डिझेल प्रतिलिटर 85.84 रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल प्रतिलिटर 92.59 रुपये आणि डिझेल प्रतिलिटर 85.98 रूपये आहे. पुण्यात पेट्रोल प्रतिलिटर 94.64 रुपये आणि डिझेल प्रतिलिटर 86.38 रुपये आहे. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख