पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवर निर्मला सीतारामन म्हणाल्या, हे तर महाभयंकर धर्मसंकट! - nirmala sitharaman says rising petrol and diesel price is maha bahaynkar dharma sankat | Politics Marathi News - Sarkarnama

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवर निर्मला सीतारामन म्हणाल्या, हे तर महाभयंकर धर्मसंकट!

वृत्तसंस्था
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. मागील सलग बारा दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. 

नवी दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहे. अनेक राज्यांत पेट्रोलच्या दराने शंभरचा टप्पा ओलांडला आहे. यावरुन केंद्रातील भाजप सरकारला विरोधकांकडून लक्ष्य करण्यात येऊ लागले आहे. आता इंधन दरवाढीची तुलना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महाभयंकर धर्मसंकटाशी केली  आहे. 

अनेक राज्यांत पेट्रोल प्रतिलिटर शंभर रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मागील 12 दिवसांत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3.63 रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3.84 रुपये वाढ झाली आहे. इंधन दरवाढीवरुन भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधक लक्ष्य करीत आहेत. यातून दिलासा देणारे कोणतेही पाऊल अद्याप केंद्र सरकारने उचललेले नाही. 

इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, केंद्र सरकारमधील मी एकमेव मंत्री नाही की जी दरवाढ कमी व्हावी, असे म्हणत आहे. परंतु, केंद्र सरकारने इंधनावरील कर कमी केल्यास राज्ये त्यांचा कर वाढवणार नाहीत याची हमी कोण घेणार? प्रत्येकाला आज पैसा आणि महसूल हवा आहे. हे तर महाभयंकर धर्मसंकट आहे. यामुळेच हे दर कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्र येऊन निर्णय घ्यायला हवेत. 

हेही वाचा : ममतादीदी भाजपवर पडल्या भारी...

वस्तू व सेवा करात (जीएसटी) पेट्रोल आणि डिझेलचा समावेश करण्याच्या मुद्द्यावर सीतारामन म्हणाल्या की, यावर सर्वंकष चर्चा जीएसटी परिषदेत व्हायला हवी. याचबरोबर राज्यांशी सल्लामसलत करायला हवी. याबाबतची तरतूद आधीच जीएसटी कायद्यात करण्यात आलेली आहे. यामुळे यासाठी संसदेत या कायद्यात कोणती दुरुस्ती करण्याची आवश्यकता नाही. जीएसटी लागू झाल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर संपूर्ण देशात एकसमान राहतील. यामुळे राज्यांचा वेगळा आणि केंद्राचा वेगळा कर असा प्रकार राहणार नाही. 

हेही वाचा : सलग बारा दिवसांच्या भडक्यानंतर दरवाढीला ब्रेक

केंद्र सरकार प्रतिलिटर पेट्रोलमागे ३२.९0 रुपये एवढा कर आकारत आहे. महाराष्ट्र सरकार २६.७८ रुपये कर आकारत आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्था कोलमडली असल्याचे कारण देत केंद्र अथवा राज्य सरकार महसुलावर पाणी सोडण्यास तयार नाही. सलग बारा दिवस इंधन दरांत वाढ झाल्याने मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ९७ रुपयांवर पोचले होते. तसेच, डिझेल ८८.६ रुपये प्रतिलिटरवर पोचले होते. आज दरात कोणताही बदल झाला नाही. 

आज तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ न केल्याने दरात कोणताही बदल झाला नाही. दिल्लीत पेट्रोलचा दर आज प्रतिलिटर 90.58 रुपये आहे. याचवेळी डिझेलचा दर प्रतिलिटर 80.97 रुपये आहे. बंगळूरमध्ये  पेट्रोल प्रतिलिटर 93.61 रुपये तर डिझेल प्रतिलिटर 85.84 रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल प्रतिलिटर 92.59 रुपये आणि डिझेल प्रतिलिटर 85.98 रूपये आहे. पुण्यात पेट्रोल प्रतिलिटर 94.64 रुपये आणि डिझेल प्रतिलिटर 86.38 रुपये आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख