प्रदेशाध्यक्षपद मिळताच सिद्धूंनी राजघराणे काढून कॅप्टन अमरिंदरसिंगांना डिवचलं

पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या विरोधात काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी उघड बंड पुकारले होते.
navjot singh sidhu uses royal barb for chief minister amarinder singh
navjot singh sidhu uses royal barb for chief minister amarinder singh

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांच्या विरोधात काँग्रेस (Congress) नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांनी उघड बंड पुकारले होते. यामुळे मुख्यमंत्र्यांचा विरोध असतानाही सिद्धू यांना प्रदेशाध्यक्षपदी बढती देण्यात आली. सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हाती घेताच पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना डिवचलं आहे. 

पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल यांनी सिद्धू यांची पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे पत्र काढले आहे. याचबरोबर चार कार्यकारी अध्यक्ष नेमण्यात आले आहेत. हिंदू आणि दलित असा समतोल साधत या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात संगतसिंग गिलझियान, सुखविंदरसिंग डॅनी, कुलजित नागरा आणि पवन गोयल यांचा समावेश आहे. सिद्धू यांनी ट्विट करीत काँग्रेस नेतृत्व आणि गांधी परिवाराचे आभार मानले आहेत. परंतु, मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. 

कॅप्टन अमरिंदरसिंग यांचे वडील हे पातियाळाचे महाराजा होते. यावरुन सिद्धू यांनी माझ्या वडिलांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी राजघराणे सोडले होते, असा टोला लगावला आहे. सिद्धू यांनी म्हटले आहे की, समृद्धी आणि स्वातंत्र्य या गोष्टी केवळ मोजक्याच लोकांसाठी नाहीत. त्या सर्वांना वाटायला हव्यात. माझे वडील काँग्रेस कार्यकर्ते होते. त्यांनी राजघराणे सोडून स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता. त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु, नंतर त्यांची शिक्षा माफ करण्यात आली. त्यानंतर  ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार आणि अॅडव्होकेट जनरल बनले होते. 

सिद्धू यांना प्रदेशाध्यक्षपद देण्याच्या प्रस्ताव पक्षाने ठेवला होता. यावर कॅप्टन नाराज आहेत. त्यांनी याबद्दल पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्र लिहिले होते. कॅप्टन यांनीही नुकतीच सोनिया गांधी यांची  भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी पक्षाच्या अध्यक्षा सांगतील तो तोडगा मान्य असेल, असे म्हटले होते. कॅप्टन यांचे पत्र मिळताच पक्ष नेतृत्वाने तातडीने रावत यांनी चॉपरने पंजाबमध्ये मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या भेटीसाठी पाठवले होते. 

पंजाबमधील अंतर्गत वाद विधानसभा निवडणुकीआधी पक्षाला परवडणारा नसल्याने नेतृत्वाने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपद मागितले होते. पक्षाने मात्र, त्यांना प्रचारप्रमुखाची जबाबदारी देण्याची तयारी दर्शविली होती. सिद्धू हे प्रदेशाध्यक्षपदावर ठाम होते. अखेर सिद्धू यांची मागणी पक्षाच्या नेतृत्वाने मान्य केली आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांना हटवले गेले आहे. सिद्धू यांच्यासोबत चार कार्यकारी अध्यक्ष दिले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून वाद सुरू आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसच्या विजयानंतर पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी याला विरोध केल्याने सिद्धू यांना दुसरे मंत्रालय देण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचा वाद सुरू असून, सिद्धू यांनी उघड बंड पुकारले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com