अधिकारी दाद देत नसल्यानं समाज कल्याण मंत्र्यांची थेट राजीनाम्याची घोषणा - Minister Madan sahani will resign from Nitish Kumar Cabinet | Politics Marathi News - Sarkarnama

अधिकारी दाद देत नसल्यानं समाज कल्याण मंत्र्यांची थेट राजीनाम्याची घोषणा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 जुलै 2021

सरकारमधील मंत्र्यांना कुणी विचारत नाही. माझ्याकडे राजीनाम्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असं समाज कल्याण मंत्री म्हणाले. 

पाटणा : प्रधान सचिव दाद नसल्याचं कारण देत समाज कल्याण मंत्र्यांनी थेट पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. अधिकाऱ्यांकडून मनमानी केली जात असून मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांना माजी मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या काही आमदारांनीही सहमती दर्शवली आहे. (Minister Madan sahani will resign from Nitish Kumar Cabinet)

बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या मंत्रीमंडळात समाज कल्याण मंत्री असलेले जेडीयुचे नेते मदन सहानी यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. ही घोषणा करण्यापूर्वी सहानी म्हणाले, ज्या बदल्या, नियुक्ती मंत्र्यांच्या स्तरावर व्हायला हव्यात, त्या अधिकारीच करत आहेत. हा अपमान सहन करत मंत्री पदावर कायम राहणे योग्य नाही. माझा राजीनामा तयार आहे. पाटणामध्ये घर आणि गाडी मिळाल्याने कुणी मंत्री होत नाही. नितीश कुमार यांच्या सोबत राहीन पण मंत्रीपदाचा राजीनामा देईन, असंही सहानी यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : भाजप आमदारांच्या गोंधळामुळं राज्यपालांनी पाच मिनिटांत केलं 'वॅाकआऊट'

सहानी यांनी थेट त्यांच्या विभागाचे प्रधान सचिव अतुल कुमार लक्ष्य केलं आहे. नितीश कुमार यांच्या सरकारमधील मंत्र्यांना कुणी विचारत नाही. माझ्याकडे राजीनाम्याशिवाय दुसरा पर्याय नाही. सरकारमध्ये अधिकारशाही निर्माण झाली आहे. चार वर्षांपासून एकाच जागेवर असून आतापर्यंत काय केलं माहिती नाही, असे सहानी म्हणाले. 

सहानी यांच्याआधी भाजपेच आमदार ज्ञानेंद्र सिंह ज्ञानू यांनीही सरकारला लक्ष्य केलं होत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मंत्र्यांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे. जेडीयूच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भीतीने पैसे घेतले नाहीत. पण भाजपच्या मंत्र्यांनी बदल्यांसाठी पैसे घेतल्याचा आरोप ज्ञानू यांनी केल्यानं बिहारमध्ये खळबळ उडाली आहे.

24 तासांत 1800 बदल्या व नियुक्त्या

बिहारमध्ये जून महिन्यात बदल्या व नियुक्त्यांना वेग आला आहे. मागील 24 तासांत विविध विभागांतील 1804 चार बदल्या व नियुक्त्या झाल्या आहेत. पुढील एक दोन दिवसांत त्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. जून महिन्यात दरवर्षी अधिकारी व कमर्चाऱ्यांच्या बदल्या होत असतात. त्यामुळे सध्या मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये वादाची ठिणगी पडत असल्याचे बोलले जात आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख