मंत्रिपद जाण्याचा धोका अन् काँग्रेसचे मंत्री म्हणू लागले पक्षासाठी काम करायचंय!

काँग्रेसमधील वाद अद्याप संपलेला नाही.
मंत्रिपद जाण्याचा धोका अन् काँग्रेसचे मंत्री म्हणू लागले पक्षासाठी काम करायचंय!
Many Ministers ready to leave posts says Ajay Makan

नवी दिल्ली : राजस्थान काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ आणि पक्ष संघटनेत मोठे बदल केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारात अनेक मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो. काँग्रेसचे प्रभारी महासचिव अजय माकन यांनी याबाबतचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मंत्र्यांना पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (Many Ministers ready to leave posts says Ajay Makan)

राजस्थान काँग्रेसमधील वाद अद्याप संपलेला नाही. मुख्यमंत्री अशोक गेहलोत व माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामध्ये संघर्ष सुरूच आहे. पायलट यांनी काँग्रेस सोडणार नसल्याचे जाहीर केलं असलं तरी पक्ष संघटनेसह मंत्रिमंडळात आपल्या समर्थक आमदारांना चांगली पदं देण्याची त्यांची मागणी आहे. त्याअनुषंगाने मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला वेग आला आहे. या विस्तारावर पायलट यांची पुढील भूमिका ठरू शकते, त्यामुळं काँग्रेस श्रेष्ठींकडून सावध पावले टाकली जात आहेत. 

अजय माकन म्हणाले की, मला दोन दिवस अनेक आमदार व मंत्री भेटले. अनेक मंत्री गरज पडल्यास पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मंत्री पद सोडण्याची तयारी अनेकांनी दर्शवली आहे. मंत्र्यांनी माझंच 2013 चं उदाहरण दिलं आहे. त्यावेळी मी मनमोहन सिंग सरकारमधील केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राहुल गांधी यांच्यासोबत महासचिव झालो. याचअनुषंगाने अनेक मंत्र्यांनी संघटनेसाठी काम करण्याची तयारी दर्शवली आहे, असे माकन यांनी स्पष्ट केलं.

अजय माकन यांच्या स्पष्टीकरणानंतर काँग्रेसमध्ये याबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळं आता मंत्रिमंडळातून अनेक मंत्री बाहेर जाऊ शकतात, हे निश्चित मानले जात आहे. राजस्थान सरकारमधील अनेक मंत्र्याबाबत नाराजी आहे. काहींच्या तक्रारीही पक्ष संघटनेकडे आल्या आहेत. या मंत्र्यांना सरकारमधून बाहेर काढलं जाण्याची शक्यता दाट आहे. 

मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सचिन पायलट यांच्या समर्थक आमदारांना जास्त संधी मिळण्याची शक्यताही आहे. पायलट यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्ष श्रेष्ठींकडून निर्णय घेतला जाऊ शकतो. पण आता कुणाला डच्चू मिळणार आणि कुणाची वर्णी लागणार यावरून राजस्थान काँग्रेसमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in