पायलट यांच्या बंडाला एक वर्ष पूर्ण...काय कमावलं, काय गमावलं? - last year congress leader sachin pilot revolted against party | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

पायलट यांच्या बंडाला एक वर्ष पूर्ण...काय कमावलं, काय गमावलं?

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 जुलै 2021

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद शमलेला नाही.

नवी दिल्ली : राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वाद शमलेला नाही. काँग्रेसकडून (Congress) अंतर्गत वादावर तोडगा काढण्यासाठी अजूनही प्रयत्नच सुरू आहेत. पायलट यांनी पुकारलेल्या बंडाला एक वर्ष पूर्ण होत असताना परिस्थितीत तसूभरही बदल झालेला दिसत नाही. पायलट यांना अद्याप संघटना आणि सरकारमध्ये कोणतेही स्थान मिळालेले नाही. 

पायलट यांनी गेल्या वर्षी 12 जुलैला बंड पुकारले होते. अखेर त्यांनी हाय कमांडशी चर्चा केल्यानंतर बंडखोरीची तलवार मान्य केली होती. मी काँग्रेस पक्षातच आहे, असे त्यांनी जाहीर केले होते. तब्बल महिनाभराच्या बंडानंतर ते स्वगृही म्हणजे राजस्थानात परतले होते. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी बोलविण्यात आलेल्या बैठकीला हजेरी लावत पायलट यांनी आपण मागील सर्व विसरून पक्षासाठी काम करणार असल्याचे संकेत दिले होते. 

पायलट आणि गेहलोत यांच्यात महिनाभर रंगलेला सत्तासंषर्घ अखेर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या पुढाकारातून मिटला होता. या दोघांशी चर्चा करत पायलट यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखविली होती. महिनाभर हरयानातील मानेसर येथील हॉटेलमध्ये असणारे पायलट समर्थकांसह 11 ऑगस्टला राजस्थानात परत आले होते. नंतर मुख्यमंत्र्याबरोबरील वाद संपुष्टात आणत पायलट हे मुख्यमंत्री गेहलोत यांच्या निवासस्थानी गेले होते.  

दरम्यान, पक्षातील अंतर्गत वादावर तोडगा काढण्यासाठी पक्षाचे राजस्थान प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस अजय माकन यांनी मागील आठवड्यात मुख्यमंत्री गेहलोत यांच्याबरोबर दोन बैठका घेतल्या होत्या. या बैठकांमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला असला तरी त्यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. यामुळे पायलट-गेहलोत वादाचे भिजत घोंगडे कायम आहे. 

हेही वाचा : भाजपमधील धर्मयुद्ध, कौरव-पांडव अन् पंकजा मुंडे...

पायलट यांनी मंत्रिमंडळात समर्थक आमदारांना जास्त प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी लावून धरली होती. परंतु, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला विरोध केला होता. राजस्थानध्ये  मंत्रिमंडळात 30 पर्यंत मंत्री असू शकतात. सध्या मुख्यमंत्री गेहलोत यांच्यासह 21 मंत्री आहेत. सरकारमध्ये सध्या 9 मंत्रिपदे रिक्त आहेत. पायलट यांनी ही सर्व मंत्रिपदे समर्थकांसाठी मागितली होती. मात्र, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला नकार दिला होता.

अजय माकन यांनी या आठवड्यात दोन वेळा मुख्यमंत्री गेहलोत यांच्याशी जयपूरमध्ये चर्चा केली. आता ते दिल्लीला रवाना झाले आहेत. गेहलोत यांच्याशी त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या फॉर्म्युलावर चर्चा केली होती. आता ते मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार आहेत. पुढील आठवड्यात ते राज्यात परतणार आहेत. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख