भाजपमधील धर्मयुद्ध, कौरव-पांडव अन् पंकजा मुंडे... - bjp leader pankaja mjunde clarifies about his stand about party | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

भाजपमधील धर्मयुद्ध, कौरव-पांडव अन् पंकजा मुंडे...

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 जुलै 2021

पंकजा मुंडे यांनी दिल्लीहून परतल्यानंतर आज कार्यकर्त्यांशी मुंबईत संवाद साधला. 

मुंबई : खासदार प्रीतम मुंडे (Preetam Munde) यांना मंत्रिपद न मिळाल्यावरुन भाजपमध्ये (BJP) गदारोळ सुरू आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankja Munde) यांच्या समर्थकांचे राजीनामासत्र सुरू आहे. यामुळे भाजमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीहून परतल्यानंतर पंकजा मुंडेंनी आज पहिल्यांदाच समर्थकांशी संवाद साधला. त्यांनी आपल्या लढ्याला धर्मयुद्धाचे स्वरुप दिले असून, कौरव-पांडव युद्धाचा दाखला दिला आहे.  

पंकजा मुंडे यांनी दिल्लीहून परतल्यानंतर आज कार्यकर्त्यांशी मुंबईत संवाद साधला. त्या म्हणाल्या की, माझ्यावर निर्भय राजकारणाचे संस्कार आहेत. मी माझ्यापेक्षा वयाने मोठे असणाऱ्या व्यक्तींचा अनादर केलेला नाही. मी कोणाला भीत नाही  पण आदर करते.  तुमच्याच जीवावर मी निर्भय आहे. कौरव आणि पांडवांचे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न पांडवांनी केला. मग मी कोण आहे? माझी इच्छा आहे की, धर्मयुद्ध टळावे, कारण माझे सैनिक आडवे पडताहेत. धारातिर्थी पडत आहेत. 

युद्ध पांडवांनी जिंकण्याचे आणखी एक कारण होते. कौरवांच्या सैन्यातील लोक मनाने पांडवांसोबत तर शरीराने कौरवांसोबत होते. त्यांच्या रथावर असलेले सारथीही त्यांच्यासोबत नसतील. काळ हा कधीच थांबत नसतो. मला काय मिळालं नाही, अशा चिल्लर लढाईत मला पडायचे नाही. आपण आज धर्मयुद्ध टाळण्यासाठीच इथे उभे आहोत. तुम्ही सगळे माझे महारथी आहात, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. 

माझा नेता मोदी, माझा नेता अमित शहा, माझा नेता जे.पी. नड्डा आहेत.  मी कष्टाला घाबरत नाही. कोयता घेऊन कामाला जाऊ. मला माझ्यासाठी आणि प्रीतमसाठी काही नको. भाजपने मला अर्ज भरायला लावला होता. पण, ते मला म्हणाले तुम्हाला देणे शक्य नाही. मी धन्यवाद  म्हणाले. नंतर रमेश कराडांचे नाव आले. त्यात काय बिघडलं? मी कोण आहे?  प्रोटोकॉलने तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. मी तुमच्यापेक्षा छोटी आहे, असे पंकजा मुंडे यांनी नमूद केले. 

हेही वाचा : सर्व समर्थकांचे राजीनामे नामंजूर करुन पंकजा मुंडे गरजल्या...

मी तुमच्या राजीनाम्यावर स्वार होणारी नाही. मला संधी मिळाली असती, तर मी भागवत कराड यांच्या शपथविधीलाही पोचले असते. ऊसाच्या फडात काम करणाऱ्या माणसाला सभापती बनवलेले आहे. त्यामुळे प्रीतम मुंडे यांच्या मंत्रिपदापेक्षा मला ते महत्त्वाचं आहे. गरीब माणूस बाजार समितीचा सभापती असल्याचा मला अभिमान आहे. वंचितांचा वाली बनण्याचं माझे स्वप्न आहे. इथे आता राम नाही, असं वाटेल त्यादिवशी बघू,  असेही त्यांनी स्पष्ट केले. 

भगिनी प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात न घेतल्याने नाराज असल्याचे सांगितले जाणाऱ्या पंकजा मुंडे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. माजी मंत्री विनोद तावडे आणि महिला आघाडीच्या माजी राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर यांच्यासह इतरही राष्ट्रीय सचिव त्यांच्यासोबत होते. पंतप्रधानांनी पंकजा मुंडे यांना स्वतंत्ररीत्या भेट दिली नसून राष्ट्रीय सचिवांच्या बैठकीत सहभागी झालेल्या सर्वांनाच पंतप्रधान यांनी आपल्या निवासस्थानी आमंत्रित केले होते, असे पक्ष सूत्रांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख