येडियुरप्पांचा 'एकला चलो रे'चा नारा..!

मुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त झालेले येडियुरप्पा आता राज्यभरात दौरा करणार आहेत. परंतु, त्यांचा हा दौरा 'एकला चलो रे' आहे.
karnataka former chief minister b s yediyurappa will tour state
karnataka former chief minister b s yediyurappa will tour state

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) आले आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त झालेले येडियुरप्पा आता राज्यभरात दौरा करणार आहेत. परंतु, त्यांचा हा दौरा 'एकला चलो रे' असून, यात पक्षातील नेत्यांना स्थान असणार नाही. यामुळे कर्नाटकातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. 

राज्यात 2023 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. भाजप नेतृत्वाने पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यात विविध दौऱ्यांचे आयोजन केले जात आहे. जनतेचा पाठिंबा मिळवणे आणि पक्षांतर्गत मतभेद दूर करणे हे यामागील उद्देश आहेत. याचवेळी येडियुरप्पांनी वेगळ्या दौऱ्याची घोषणा केल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या दौऱ्यात भाजपच्या नेत्यांना स्थान नसेल. या दौऱ्यात येडियुरप्पा हे  भाजपचे पदाधिकारी, स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधतील.  

पक्षनेतृत्व आणि येडियुरप्पा यांचा एकच उद्देश असून, त्यांना पुढील विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपची सत्ता आणायची आहे. असे असले तरी दोन्हींचे मार्ग वेगळे आहेत. यातून भाजपमधील मतभेद समोर येऊ लागले आहेत. येडियुरप्पांच्या दौऱ्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी भाजपचे सरचिटणीस व राज्य प्रभारी अरुणसिंह हे आता राज्याचा दौरा करीत आहेत. ते सध्या जुन्या म्हैसूर विभागात आहेत. ते हुबळीकडे रवाना होणार आहेत. नंतर ते दक्षिण कर्नाटकातील इतर भागांचा दौरा करणार आहेत. 

येडियुरप्पांनी 26 जुलैला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर महिनाभरातच ते विदेशात गेले होते. येडियुरप्पांना खासदार बी.वाय.राघवेंद्र आणि भाजपचे उपाध्यक्ष बी.वाय.विजयेंद्र ही दोन मुले आणि तीन मुली आहेत. मुले आणि मुलींच्या कुटुंबांसमवेत येडियुरप्पा 18 ऑगस्टला मालदीवला रवाना झाले होते. मागील 10 वर्षांत प्रथमच येडियुरप्पा हे कुटुंबीयांना घेऊन विदेशात फिरायला गेले होते. येडियुरप्पा परतल्यानंतर त्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू आहे. यासाठी येडियुरप्पांच्या दिमतीला तब्बल 1 कोटी रुपयांची महागडी कार असेल. टोयोटा वेलफायर ही ती कार असून, या कारमधून येडियुरप्पा राज्यभरात दौरा करणार आहेत. 

येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी बोम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. येडियुरप्पा यांच्या संमतीनेच त्यांची निवड झाली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com