येडियुरप्पा पायउतार होणार? मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी खास मेजवानीचे आयोजन

कर्नाटकात भाजपमधील अंतर्गत मतभेद दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. यामुळे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा हे मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्याची शक्यता आहे.
karnataka cm b s yediyurappa organizes special lunch for secretariat officer-sj84
karnataka cm b s yediyurappa organizes special lunch for secretariat officer-sj84

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) भाजपमधील (BJP) अंतर्गत मतभेद दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांना पदावरुन हटवले जावे, अशी पक्षातूनच मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर येडियुरप्पांनी नुकतीच दिल्लीत हाय कमांडची भेट घेतली होती. आता येडियुरप्पांनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी खास स्नेहभोजनाचे आयोजन केले असून, त्यांनी स्वत:हून मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री कार्यालयाने मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी 25 जुलैला विशेष मेजवानीचे आयोजन केले आहे. यानंतर दुसऱ्याच दिवशी 26 जुलैला भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक होत आहे. त्यामुळे येडियुरप्पा हे मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचबरोबर येडियुरप्पांनी संसदीय पक्षाच्या बैठकीनंतर आमदारांसाठीही मेजवानीचे आयोजन केले आहे. त्याआधी 23 अथवा 24 जुलैला ते त्यांच्या शिवमोगा जिल्ह्यातील गावी जाणार आहेत. 

येडियुरप्पांनी या मेजवानीचे आयोजन केल्याने ते पक्षाच्या संसदीय बैठकीत राजीनामा देतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, येडियुरप्पांचे समर्थक याचा इन्कार करीत आहेत. येडियुरप्पा यांना नुकतेच पक्ष नेतृत्वाने दिल्लीला पाचारण केले होते. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही येडियुरप्पा यांनी भेट घेतली. या भेटीत येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. यासाठी येडियुरप्पांनी प्रकृतीचे कारण पुढे केले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पक्षाच्या नेतृत्वाची भेट घेतल्यानंतर येडियुरप्पांना प्रसारमाध्यांनी राजीनाम्याबाबत विचारणा केली होती. यावर त्यांनी कुठला राजीनामा, असा प्रतिप्रश्न माध्यमांना केला होता. ते म्हणाले होते की, मी पंतप्रधानांना भेटलो आहे. राज्यातील विकासकामांबाबत त्यांच्याशी चर्चा झाली आहे. मी पुन्हा ऑगस्टमध्ये दिल्लीत परत येणार आहे. राजीनाम्याचा बातम्यांना अजिबात महत्व नाही. राज्यातील नेतृत्व बदलाबाबत कोणताही चर्चा झालेली नाही. मला कुणीही राजीनामा देण्यास सांगितलेले नाही.

उत्तराखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री तिरथसिंह रावत यांना असेच अचानक दिल्लीत बोलावण्यात आले होते. नंतर त्यांनी राज्यात परत जाऊन थेट राज्यपालांकडे राजीनामा सोपवला होता. त्यानंतर पुष्करसिंह धामी उत्तराखंडचे नवीन मुख्यमंत्री बनले होते. त्यामुळे कर्नाटकमध्ये उत्तराखंडची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com