मोदींसमोर तयारी दाखवणारे येडियुरप्पा बाहेर आल्यावर म्हणाले, कुठला राजीनामा? - karnataka cm b s yediyurappa denies rumours about resignation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

मोदींसमोर तयारी दाखवणारे येडियुरप्पा बाहेर आल्यावर म्हणाले, कुठला राजीनामा?

वृत्तसंस्था
शनिवार, 17 जुलै 2021

कर्नाटकात भाजपमधील अंतर्गत मतभेद दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांना पदावरुन हटवले जावे,  अशी पक्षातूनच मागणी होत आहे. 

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) भाजपमधील (BJP) अंतर्गत मतभेद दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांना पदावरुन हटवले जावे,  अशी पक्षातूनच मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर येडियुरप्पांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत येडियुरप्पांनी राजीनामा दर्शवण्याची तयारी दशर्वली होती पण भेट झाल्यानंतर त्यांनी कुठला राजीनामा असा उलटा प्रश्न माध्यमांनाच केला. 

येडियुरप्पा यांना पक्ष नेतृत्वाने दिल्लीला पाचारण केले आहे. ते 16 जुलैला दिल्लीत दाखल झाले असून, त्यांनी पहिल्यांदा पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल सायंकाळी 7 वाजता येडियुरप्पा यांनी भेट घेतली. या भेटीत येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. यासाठी येडियुरप्पांनी प्रकृतीचे कारण पुढे केले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पक्षाच्या नेतृत्वाची भेट घेतल्यानंतर येडियुरप्पांना प्रसारमाध्यांनी राजीनाम्याबाबत विचारणा केली. यावर त्यांनी कुठला राजीनामा, असा प्रतिप्रश्न माध्यमांना केला. ते म्हणाले की, मी पंतप्रधानांना भेटलो आहे. राज्यातील विकासकामांबाबत त्यांच्याशी चर्चा झाली आहे. मी पुन्हा ऑगस्टमध्ये दिल्लीत परत येणार आहे. राजीनाम्याचा बातम्यांना अजिबात महत्व नाही. राज्यातील नेतृत्व बदलाबाबत कोणताही चर्चा झालेली नाही. मला कुणीही राजीनामा देण्यास सांगितलेले नाही.  

हेही वाचा : पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी क्लिनचिट दिल्याने संजय राठोडांचे कमबॅक 

उत्तराखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री तिरथसिंह रावत यांना असेच अचानक दिल्लीत बोलावण्यात आले होते. नंतर त्यांनी राज्यात परत जाऊन थेट राज्यपालांकडे राजीनामा सोपवला होता. त्यानंतर पुष्करसिंह धामी उत्तराखंडचे नवीन मुख्यमंत्री बनले होते. त्यामुळे कर्नाटकमध्ये उत्तराखंडची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. परंतु, पक्ष नेतृत्वाने अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे सूत्रांनी दिली. 

येडियुरप्पा आणि मंत्रिमंडळातील काही सहकाऱ्यांचे संबंध काही दिवसांपासून बिघडले आहेत. राज्य सरकारमध्ये येडियुरप्पा कुटुंबीयांचा सातत्याने हस्तक्षेप सुरू आहे. सरकारच्या प्रत्येक विभागात येडियुरप्पांचा मुलगा ढवळाढवळ करीत आहे, असा आरोप करण्यात येत आहे. कर्नाटकात मागील काही काळापासून भाजपच्या नेत्यांनी उघडपणे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. याचबरोबर काही आमदारांनी तर थेटपणे मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे. राज्यातील भाजप नेत्यांमध्ये मुख्यमंत्र्यांबद्दल मोठी नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पदावरुन हटवले जाईल, अशी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रभारी अरुणसिंह यांनी नुकतीच राज्यातील नेत्यांशी चर्चा केली होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख