जोतिरादित्य शिंदेंकडून त्यांच्या राज्याला मोठं गिफ्ट..35 दिवसांत 44 नवीन फ्लाईट्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा नुकताच मेगाविस्तार झाला. यातजोतिरादित्य शिंदे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचे बक्षीस मिळाले.
jyotiraditya scindia gift to madhya pradesh 44 new flights in 35 days
jyotiraditya scindia gift to madhya pradesh 44 new flights in 35 days

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) नुकताच मेगाविस्तार झाला. यात मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार पाडून कमळ फुलवणारे जोतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांना कॅबिनेट मंत्रिपदाचे बक्षीस मिळाले. त्यांना नागरी हवाई वाहतूक मंत्रालय देण्यात आले. मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर 35 दिवसांत मध्य प्रदेशला 44 नवीन उड्डाणांचे मोठे गिफ्ट दिले आहे. 

शिंदे म्हणाले की, मागील 35 दिवसांत मध्य प्रदेशसाठी 44 नवीन उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत. ही उड्डाणे जबलपूर ते मुंबई, पुणे, सूरत, हैदराबाद आणि कोलकता ही उड्डाणे आजपासून सुरू होत आहेत. जबलपूर ते दिल्ली आणि इंदोर ही उड्डाणे 20 ऑगस्टपासून सुरू होतील. यातील 8 उड्डाणे ही उडाण योजनेतील आहेत. देशातील छोटी विमानतळे आणि महानगरे तसेच, शहरे यांना जोडण्यासाठी ही योजना आहे. 

शिंदे यांनी 22 समर्थक आमदारांसह मागील वर्षी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे मध्य प्रदेशातील कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार कोसळले होते. नंतर शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार राज्यात सत्तेत आले. त्यावेळी त्यांना राज्यसभेवर घेण्यात आले होते. राज्यात सत्तांतर घडवणाऱ्या जोतिरादित्य शिंदेंना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. त्यांच्याकडे नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली. 

काही दिवसांपूर्वी इंदोर दौऱ्यात बोलताना शिंदे म्हणाले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताला नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात आघाडीवर नेण्याचा माझा प्रयत्न असेल. माझ्यावर विश्वास टाकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे मी आभार मानतो. मी लोकांची सेवा करण्यासाठी तयार  आहे. 

काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात 2009 ते 2012 मध्ये शिंदे हे केंद्रात वाणिज्य व उद्योग मंत्री होते. नंतर 2012 ते 2014 मध्ये त्यांच्याकडे ऊर्जा मंत्रालय होते. काँग्रेसच्या 2019 मधील लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे हे भाजपमध्ये दाखल झाले होते. नंतर भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवले होते. 

मोदींच्या या नव्या मंत्रिमंडळात सर्वांत श्रीमंत मंत्री जोतिरादित्य शिंदे असून, महाराष्ट्रातील नारायण राणे तिसऱ्या क्रमांकावर आहेत, अशी माहिती असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (ADR) अहवालातून समोर आली आहे. नव्या मंत्रिमंडळात 70 मंत्री (90 टक्के) करोडपती आहेत. प्रत्येक मंत्र्याची सरासरी संपत्ती 16.24 कोटी रुपये आहे. जोतिरादित्य शिंदे, पीयूष गोयल, नारायण राणे आणि राजीव चंद्रशेखर या चार मंत्र्यांची संपत्ती 50 कोटी रुपयांहून अधिक आहे. सर्वांत श्रीमंत मंत्री जोतिरादित्य शिंदे आहेत. त्यांची संपत्ती 379 कोटी रुपये आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com