देशातील कोरोनाचा पहिला रुग्ण आज पुन्हा सापडला पॉझिटिव्ह - Indias first COVID19 case has tested positive again in Kerala | Politics Marathi News - Sarkarnama

देशातील कोरोनाचा पहिला रुग्ण आज पुन्हा सापडला पॉझिटिव्ह

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 जुलै 2021

30 जानेवारी 2020 रोजी एका रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेने (NIV) दिला होता.

नवी दिल्ली : चीनमधील वुहान प्रांतात कोरोनाचा (Covid-19) संसर्ग वाढू लागल्यानंतर तेथील अनेक जण भारतात परतले. त्यामुळं भारतातील कोरोनाचा धोका वाढला होता. जानेवारी महिन्यातील तीन आठवडे उलटून गेल्यानंतर भारतात कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही. पण महिन्याच्या अखेरीस 30 जानेवारी 2020 रोजी एका रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेने (NIV) दिला अन् संपूर्ण हादरून गेला. हाच रुग्ण पुन्हा कोरोनाबाधित झाल्याचे मंगळवारी (ता. 13) आलेल्या अहवालात स्पष्ट झालं. (Indias first COVID19 case has tested positive again in Kerala)

केरळमधील थ्रिसूर जिल्ह्यातील 21 वर्षांची ही तरूणी आहे. तिचा आरटी-पीसीआर (RT-PCR) अहवाल पॅाझिटिव्ह आला असून सध्या कोणतीही लक्षणे नाहीत, अशी माहिती जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॅा. के. जे. रीना यांनी दिली. ही तरूणी भारतातील पहिली कोरोनाबाधित रुग्ण होती. सुमारे 18 महिन्यांच्या कालावधीनंतर तिला पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पहिल्यांदा ती बाधित आढळली तेव्हा कोरडा खोकला हे लक्षण होतं. 

हेही वाचा : सर्व समर्थकांचे राजीनामे नामंजूर करीत पंकजा मुंडे गरजल्या

ही तरूणी चीनमधील वुहान शहरात वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होती. चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर ती 23 जानेवारी 2020 रोजी केरळमध्ये परतली होती. तिला 26 तारखेपर्यंत कोणतंही लक्षण नव्हतं. पण 27 तारखेला सकाळी कोरडा खोकला आणि घसा दुखत असल्याचे तिला जाणवले. त्याच दिवशी तिला थ्रिसूर येथील सरकारी रुग्णालयात बोलवून घेण्यात आले. तिची सर्व तपासणी केल्यानंतर अन्य कोणताही त्रास नसल्याचे स्पष्ट झाले.

या तरूणीला तातडीने विलगीकरण कक्षात हलवण्यात आले. तिच्या घशातील नमूना घेऊन NIV मध्ये पाठवण्यात आला. त्यावेळी केवळ पुण्यातच तपासणी केली जात होती. आरटी-पीसीआर चाचणीत तिला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. हा अहवाल 30 जानेवारी रोजी आला. तिला औषधोपचार सुरू केल्यानंतर तीनच दिवसांत तिची लक्षणे कमी झाली. ता. 3 फेब्रुवारी रोजी तिला कोणतंही लक्षणं नव्हतं.  

कधी झाली कोरोनामुक्त?

लक्षणे दिसल्यापासून सतराव्या दिवशीही तिचा अहवाल पॅाझिटिव्ह आला होता. त्यानंतर 19, 21 व 23 व्या दिवशी तिचा नमुना पुन्हा पाठवण्यात आला. या तिन्हीवेळा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळं 20 फेब्रुवारीला तिला घरी सोडण्यात आले. ही तरूणी भारतातील पहिली रुग्ण ठरल्यानंतर महाराष्ट्रात 9 मार्च रोजी पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर महाराष्ट्रासह देशातही कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत गेली. पहिल्या लाटेच्या तुलनेत देशात दुसऱ्या लाटेने कहर केला. 

देशातील कोरोनाची स्थिती

भारतात आतापर्यंत 3 कोटींहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. सध्या 3 कोटी 63 हजार 720 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 32 हजार 778 सक्रीय रुग्ण आहेत. देशभरात 4 लाख 10 हजार 784 जणांचा मृत्यू झाला आहे. ता. 13 जुलै रोजी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासांत 32 हजार 906 नवे रुग्ण आढळून आले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख