धक्कादायक : वरिष्ठांच्या छळाला कंटाळून महिला आयएएसचा तडकाफडकी राजीनामा

वरिष्ठांच्या छळाला कंटाळून आयएएस अधिकारी व म्हैसूर महापालिकेच्या आयुक्त शिल्पा नाग यांनी आज राजीनामा तडकाफडकी दिला.
ias officer shilpa nag resigns after blaming rohini sindhuri
ias officer shilpa nag resigns after blaming rohini sindhuri

म्हैसूर : वरिष्ठांच्या छळाला कंटाळून आयएएस अधिकारी (IAS) व म्हैसूर (Mysore) महापालिकेच्या आयुक्त शिल्पा नाग (Shilpa Nag) यांनी आज राजीनामा तडकाफडकी दिला. कोरोना महामारीच्या काळात इतर अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शिल्पा नाग यांच्या तडकाफडकी राजीनाम्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 

राजीनाम्या दिल्याची घोषणा नाग यांनी पत्रकार परिषदेत केली. त्या म्हणाल्या की, आज मी राजीनामा देत आहे. माझे कर्तव्य पार पाडण्यासाठी येथे योग्य वातावरण नाही. कुणीही माझ्यासारखे अशा परिस्थितीतून जाऊ नये. जिल्हा उपायुक्त रोहिणी सिंदुरी (Rohini Sindhuri) यांनी माझा अपमान केला आहे. मी माझा राजीनामा मुख्य सचिवांकडे पाठवला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही सिंदुरी या लक्ष्य करीत आहेत. महापालिकेने अनेक चांगले उपक्रम राबवले आहेत. परंतु, याचे श्रेय जिल्हा प्रशासन घेत आहे. 

राज्याच्या मुख्य सचिवांच्या कार्यालयाने शिल्पा नाग यांचा राजीनामा मिळाला नसल्याचे म्हटले आहे. हा वाद मिटवण्यासाठी खुद्द मुख्य सचिव पी. रवि कुमार हे म्हैसूरला भेट देणार असल्याचे समजते. दरम्यान, म्हैसूरचे पालकमंत्री एस.टी.सोमशेखर यांनी नाग यांचा राजीनामा सरकार स्वीकारणार नाही, असे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांशी या प्रकरणी चर्चा करण्याची भूमिकाही त्यांनी घेतली आहे. 

म्हैसूर जिल्ह्याच्या उपायुक्त रोहिणी सिंदुरी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्या म्हणाल्या की, म्हैसूर शहर महापालिका कोरोनाचे नवीन रुग्ण, मृत्यू आणि सक्रिय रुग्णसंख्या याबाबत चुकीचे आणि विरोधाभासी आकडे सादर करीत होती. यात दुरुस्ती करुन त्यांना आकडेवारी सादर करण्यास सांगण्यात आले होते. शिल्पा नाग यांनी मागील काही काळापासून कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी होत असलेल्या बैठकांना हजेरी लावणेही बंद केले होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com