सावधान : आता डेल्टा प्लस कोरोनाचे संकट; सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात 

संक्रमण क्षमतेत वाढ,फुप्फुसांच्या पेशींशी संयुग होण्याची अधिक क्षमता ही या विषाणूची वैशिष्टय आहेत.
Health Ministry advises on Delta Plus Variant of COVID19 a Variant of Concern
Health Ministry advises on Delta Plus Variant of COVID19 a Variant of Concern

नवी दिल्ली : कोरोना विषाणुच्या जनुकीय रचनेत सतत बदल होत आहे. भारतात कोरोनाचा कहर केलेल्या कोरोनाच्या डेल्टा या विषाणुच्या प्रकारानंतर आता डेल्टा प्लस हा विषाणू अधिक धोकादायक असल्याचे स्पष्ट झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानंही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. भारतात या विषाणुचा संसर्ग झालेल्या सुमारे 40 रुग्ण आढळले असून त्यापैकी सर्वाधिक 21 रुग्ण महाराष्ट्रात आहेत. (Health Ministry advises on Delta Plus Variant of COVID19 a Variant of Concern)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इन्साकॉग- इंडियन सार्स कोवि-2 जीनोम कंसॉर्टीयाच्या अलीकडच्या अध्ययनाच्या आधारावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र, केरळ आणि मध्यप्रदेश या राज्यांना कोविड-19 च्या डेल्टा प्लस या नव्या व्हेरीयंट म्हणजे प्रकाराबाबत सावध आणि सजग राहण्याचा सल्ला दिला आहे. हा नव्या स्वरूपाचा विषाणू या राज्यांच्या काही जिल्ह्यात आढळला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या तिन्ही राज्यांना पत्र पाठवले आहे. महाराष्ट्राच्या रत्नागिरी आणि जळगाव जिल्ह्यांत, केरळच्या पलक्कड आणि पाठ्नामथित्ता जिल्ह्यांत तसेच मध्यप्रदेशातील भोपाळ आणि शिवपुरी जिल्ह्यात हा व्हेरीयंट आढळला आहे. या व्हेरीयंटचा सामना करतांना सार्वजनिक आरोग्यविषयक उपाययोजना आधीप्रमाणेच अंमलात आणायच्या असल्या तरीही, त्या अधिक प्रभावीपणे आणि या व्हेरीयंटच्या रुग्णांकडे बारकाईने लक्ष देत अंमलात आणल्या जाव्यात, अशा सुचना मंत्रालयाने दिल्या आहेत. 

इन्साकॉगने निश्चित केलेले या विषाणूच्या संसर्गाचे समूह आणि जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधित क्षेत्राविषयीच्या उपाययोजना तातडीने अंमलात आणल्या जाव्यात. असे निर्देश राज्यांच्या मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत. यात गर्दी आणि सार्वजनिक ठिकाणी संचारावर निर्बंध, चाचण्यांची संख्या वाढवणे, संशयित रुग्णांचा माग अशा उपायांचा समावेश आहे. तसेच या भागात लसीकरणाला वेग देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. कोविड पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांच्या स्वाबचे नमुने ताबडतोब इंसाकॉगच्या प्रयोगशाळांमध्ये पाठवले जावे जेणेकरुन त्यांचे क्लिनिकल परीक्षण लगेच केले जाऊन, राज्यांना त्याविषयी माहिती दिली जाऊ शकेल, अशीही सूचना राज्यांना देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात 21 रुग्ण

डेल्टा प्लस विषाणूचा संसर्ग झालेले 21 रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी सर्वाधिक 9 रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यात असून 7 जळगावमध्ये, 2 मुंबईत तर ठाणे, पालघर व सिंधुदुर्गमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे 7500 नमुने राष्ट्रीय विषाणू संस्थेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यापुढेही प्रत्येक जिल्ह्यातून असे नमुने जुनकीय रचनेचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात येणार आहेत.

या विषाणूच्या स्वरुपाची वैशिष्ट्ये :
- संक्रमण क्षमतेत वाढ
- फुप्फुसांच्या पेशींशी संयुग होण्याची अधिक क्षमता
- मोनोक्लोनल अँटिबॉडी प्रतिसाद कमी होण्याची शक्यता

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com