भारतात कोरोना लस मिळेना अन् अमेरिकेने निम्म्या लोकसंख्येला दिले दोन्ही डोस !

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. यामुळे सरकारने लसीकरणावर भर दिला असला तरी लस टंचाईमुळे यात अडथळे येत आहेत.
half of american adults fully vaccinated says us president joe biden
half of american adults fully vaccinated says us president joe biden

नवी दिल्ली :  देशात कोरोना (Covid19) संसर्गाची दुसरी लाट आली असून, सरकारने लसीकरणावर (Covid vaccination) भर दिला आहे. परंतु, देशात सध्या लस टंचाई आहे. यामुळे लसीकरण मोहिमेचा फज्जा उडाला आहे. याच्या उलट चित्र अमेरिकेत (USA) आहे. अमेरिकेतील निम्म्या नागरिकांना तेथील सरकारने लस दिली आहे. 

अमेरिकेतील 50 टक्के प्रौढांचे आजच्या घडीला पूर्ण लसीकरण (दोन्ही डोस) झाले आहे. ही अतिशय मोठी गोष्ट आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी ट्विटरवर म्हटले आहे. डिसिज कंट्रोल अँड  प्रिव्हेन्शन (सीडीसी) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी डिसेंबर महिन्यात लसीकरण सुरू झाल्यापासून अमेरिकेने यात लक्षणीय प्रगती केली आहे. देशातील निम्म्या प्रौढांचे लसीकरण पूर्ण होणे ही महत्वाची बाब आहे. 

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची धुरा जो बायडन यांनी हाती घेतली त्यावेळी फक्त 1 टक्का नागरिकांचे लसीकरण झाले होते. आता 4 जुलैपर्यंत किमान 70 टक्के जनतेला पहिला डोस तरी देण्याचे नियोजन आहे. अमेरिकेत लशीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण 61.6 टक्के असून, त्यांची संख्या 15.9 कोटी आहे. अमेरिकेत डिसेंबर महिन्यात फायजर-बायोएनटेक आणि मॉडर्ना या कंपन्यांच्या लशींना परवानगी देण्यात आली. सुरवातीला ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी यांनी लस देण्यात आली. नंतर अमेरिकेने जॉन्सन अँड जॉन्सनच्या लशीला फेब्रुवारी महिन्यात परवानगी दिली. 

सीडीसीच्या नियमानुसार, आता पूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांना घरात आणि घराबाहेर मास्क घालण्याची आवश्यकता नाही. परंतु, दोन्ही डोस न घेतलेल्या नागरिकांना मास्क घालावा लागणार आहे. 

भारतात लसीकरण केंद्रे बंद 
सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. परंतु, आता लस नसल्याने अनेक लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. 

सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाही लस दिली गेली. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

Edited by Sanjay Jadhav 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com